सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून, दिनांक 13 एप्रिल 2026 ते 18 एप्रिल 2026 या कालावधीत विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या.
या कारवाईत एकूण पाच जुगार प्रकरणे नोंदविण्यात आली असून 31 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील भाजी मंडी, खादी चौक, ज्योती बार समोरील रस्ता, लालगुडा परिसर आदी भागांत लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी सापळे रचून ही कारवाई केली. जुगार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, अशा बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून सातत्याने माहिती संकलन केले जात असून विशेष पथकांच्या माध्यमातून छापेमारी मोहीम राबवली जात आहे.
पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून नागरिकांनीही जुगारासारख्या बेकायदेशीर प्रकारांची माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी यांनी केले आहे.