टॉप बातम्या

कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा खाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू; पेसा क्षेत्रातील धक्कादायक घटना

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जुन्या व कालबाह्य दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत महिला बेबी तुळशीराम राजगडकर (वय ५५) अशी असून, त्या आज सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घरातील कपडे धुण्यासाठी गावाजवळील बंद पडलेल्या दगड खाणीवर गेल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून खाणीत पावसाचे पाणी साचलेले होते. कपडे धुत असताना अचानक पाय घसरल्याने त्या खोल पाण्यात पडल्या. खाण खोल असल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. खाणीच्या काठावर त्यांचे कपडे व इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.

प्रशासनाचा निष्काळजीपणा?
मौजा नरसाळा येथील पेसा क्षेत्रातील बंद पडलेल्या दगड खाणी उत्खननानंतर तशाच उघड्या ठेवण्यात आल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी कोणतेही संरक्षक कुंपण किंवा इशारा फलक नसल्याने अशा अपघाती घटना वारंवार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.परिणामी, सदर ग्रामस्थानी खाणधारक यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.


“मौजा नरसाळा येथील कालबाह्य दगड खाणी तातडीने बुजविण्याबाबत आम्ही यापूर्वीच जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना ई-मेलद्वारे कळविले होते. मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. संबंधित खाणी न बुजविणे तसेच संरक्षक कुंपणाची व्यवस्था न करणे, यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. या घटनेला प्रशासनच जबाबदार आहे.”
— विवेक तोडासे
आरटीआय कार्यकर्ता तथा आदिवासी टायगर सेना, तालुका अध्यक्ष (मारेगाव)


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();