सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील मौजा नरसाळा येथील पेसा क्षेत्रात असलेल्या कालबाह्य व असुरक्षित दगड खाणीमुळे एका आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित खाण मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सर्व धोकादायक खाणी तत्काळ बुजविण्याची मागणी आदिवासी टायगर सेना तालुका अध्यक्ष विवेक सुदामजी तोडासे यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी नरसाळा येथील कालबाह्य दगड खाणीत साचलेल्या पाण्यात पडून बेबी तुळशीराम राजगळकर या आदिवासी महिलेचा मृत्यू झाला. ही खाण बराच काळापासून बंद असूनही ती उघडी व असुरक्षित अवस्थेत असल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तोडासे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित खाण धारकाने कोणतीही सुरक्षा व्यवस्था, कुंपण किंवा इशारा फलक न लावता नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच, प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेला केवळ अपघात न मानता सदोष मनुष्यवध मानून संबंधित खाण मालकावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. यासोबतच पेसा क्षेत्रातील सर्व कालबाह्य व धोकादायक खाणी तत्काळ बुजविण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हा महासचिव अमोल कुमरे, सौ. रंजना आत्राम विदर्भ संघटिका, लहानू सालूरकर वणी तालुका अध्यक्ष, महेश आत्राम सचिव, सौ पूजा वासरीकर महिला अध्यक्ष, सुनील उईके, रीना ठमके, दीपा कोवे आदीं उपस्थित होते.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.