सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : नांदेपेरा–मार्डी मार्गावरील फिसकी जंगल परिसरात सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान लुटीचा प्रयत्न फसल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन विजय चिंचोलकर (वय २५, रा. वणी) हे शेती व्यवहारासाठी घेतलेली सुमारे ३ लाख रुपयांची रोकड घेऊन मोटारसायकलने वणीहून नांदेपेरा मार्गे मार्डीकडे जात होते. दरम्यान,फिसकी जंगलातील हनुमान मंदिराजवळ मागून आलेल्या तिघा अज्ञात इसमांनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत लाथ मारून त्यांना खाली पाडले. यात चिंचोलकर भर रस्त्यावर अनियंत्रित झाले.
दरम्यान, समोरून वाहने वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यामुळे रोकड लुटण्याचा त्यांचा डाव फसल्याची समजते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
घटनेनंतर चिंचोलकर यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी BNS कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.