सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : उन्हाच्या कडाक्यात तहानलेल्या प्रत्येक जीवाला पाण्याचा थेंब म्हणजे जणू जीवनदानच… आणि याच भावनेतून शहरातील पेट्रोल पंपावर उभारण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन आज अत्यंत भावनिक वातावरणात पार पडले.
तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या हस्ते या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. ही पाणपोई स्वर्गीय मारोती रोगे व स्वर्गीय सुंदराबाई रोगे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते दयाल रोगे यांनी उभारली आहे.
आई-वडिलांच्या स्मृती जपण्याचा हा केवळ एक उपक्रम नसून, त्यांच्या संस्कारांचा जिवंत वारसा जपण्याचा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. “त्यांनी दिलेल्या माणुसकीच्या शिकवणीचे हेच खरे रूप आहे,” अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उन्हाच्या झळांमध्ये प्रवासी, कामगार, गरजू नागरिक यांना थंड पाण्याचा आधार मिळावा, या निःस्वार्थ हेतूने उभारलेली ही पाणपोई आता अनेकांसाठी दिलासा ठरणार आहे.
या उपक्रमातून “माणुसकीची तहान भागवणं हीच खरी सेवा” असा संदेश देत, दयाल रोगे यांनी आपल्या आई-वडिलांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.
उन्हाळ्यात नागरिकांसाठी ही पाणपोई मोठा दिलासा ठरणार असून, परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.