सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगरपरिषद निवडणुकीचा भोंगा वाढत असताना प्रभाग 9 मध्ये शिवसेना (शिंदे गट) चे नुकतेच पक्ष प्रवेश केलेले कार्यकर्ते कुणाल चोरडिया यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. बुधवारी वणी येथील भव्य सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्साहवर्धक मार्गदर्शनानंतर संपूर्ण संघटना नव्या जोमाने मैदानात उतरली आहे.
शिंदे यांच्या दमदार भाषणाचा परिणाम स्थानिक पातळीवर तत्काळ दिसून आला असून शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. त्यानुसार कुणाल चोरडिया हे स्वतः उमेदवारांच्या पाठीशी उभे राहत घराघरात संपर्क साधत आहेत. नागरिकांना पक्षाची विकासनिष्ठ भूमिका, प्रभागातील समस्या व त्यावरील उपाययोजना यांची माहिती देत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
चोरडिया यांनी सांगितले की, “प्रभाग 9 मधील आणि सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणणे हा आमचा संकल्प असून त्यासाठी कार्यकर्ते एकदिलाने मेहनत घेत आहेत.”
सभेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला अभूतपूर्व गती मिळाली असून प्रभागात सर्वदूर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत प्रभाग 9 हा निर्णायक ठरेल, अशीही चर्चा रंगू लागली आहे.