सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : आदिवासी समाजाचे वीर योद्धा व स्वातंत्र्यसंग्रामातील महान क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती वडगाव येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त गावात विविध उपक्रम राबवून सामाजिक ऐक्य व प्रेरणादायी परंपरेला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, आदिवासी परंपरेचे दिग्दर्शन करणाऱ्या पारंपरिक वस्त्रांमध्ये युवक-युवतींचा उत्साह लक्षवेधी ठरला.
या कार्यक्रमाला बिरसा मुंडा विचार मंचाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सालूरकर, गंगाधर गेडाम गुरुजी, लहानू सालूरकर, शंकर परचाके, बाबाराव सालुरकर, गोपाल बोरकर, संदीप परचाके, सरपंच सौ. अर्चना डाखरे, उपसरपंच समीर आवारी, पोलिस पाटील विठ्ठल डाखरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश वाटेकर, ग्रामपंचायत सदस्य गोपाल आवारी, महादेव परचाके, संगीता आस्व्वले, सोनटक्के ताई तसेच सर्व गावकरी आणि आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती कार्यक्रमातून बिरसा मुंडा यांच्या त्याग, संघर्ष आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याची प्रेरणादायी आठवण गावकऱ्यांनी नव्याने जागवली. गावभर साजरा झालेला हा उत्साह सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला.