सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगर परिषद निवडणुकीची उलटी गणती सुरू झाली असून प्रचार मोहिमेचा उद्या अंतिम दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकीय तापमान चांगलेच चढले असून प्रत्येक पक्षाने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. प्रचंड थंडीतही सभा, पदयात्रा आणि घरदार भेटींनी निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दमदार प्रवेश केलेल्या शिवसेना (शिंदे गट) कडे शहराचे लक्ष वेधले गेले आहे. आखलेल्या काटेकोर रणनीतीमुळे आणि प्रभागनिहाय सक्रिय मोहिमेमुळे या गटाने विरोधकांसमोर नवीन समीकरण निर्माण केले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यावेळी अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते, असा राजकीय वर्तुळात कयास व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज ३० नोव्हेंबर, रविवार रोजी शिवसेना (शिंदे गट) तर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार कु. पायल यशवंत तोडसाम तसेच सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात सकाळी १० वाजता शासकीय मैदान पाण्याच्या टाकीपासून होणार असून शहरातून भव्य मिरवणुकीच्या स्वरूपात ती मार्गक्रमण करणार आहे.
या रॅलीला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून ताकद दाखवण्याचे आवाहन शिवसेना नेते विजय चोरडिया, विनोद मोहीतकर, मनिष सुरावार आणि कुणाल चोरडिया यांनी केले आहे.