सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
केळापूर : महसूल प्रशासनाचा कणा मानला जाणारा महसूल सेवक (पूर्वाश्रमीचे कोतवाल) यांना शासनाने अद्याप शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला नाही. या मागणीसाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनेने कळविले आहे की, शासनाने मागण्या ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत मान्य न केल्यास १२ सप्टेंबरपासून तालुका व जिल्हास्तरावर बेमुदत कामबंद, धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू होणार आहे.
गावपातळीवर निवडणुका, पिक पाहणी, पिकविमा नोंदणी, शेतसारा वसुली, शासकीय योजना अंमलबजावणी अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महसूल सेवक पार पाडतात. मात्र, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करूनही शासनाच्या कोणत्याही सुविधा किंवा वेतनश्रेणीचा लाभ मिळत नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष योगेश शेडमाके, विदर्भ अध्यक्ष रवी बोदले, जिल्हाध्यक्ष उत्तम पाचभाई करणार असून सर्व महसूल सेवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.