सह्याद्री चौफर | ऑनलाईन
वणी : वणी ते कायर मार्गावर जिवघेणे खड्डे पडले आहेत.सदर रस्त्यांवरुन जायचे तरी कसे? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. सध्या पावसाने कहर केला असून जागोजागी खड्यात डबक्याचे स्वरूप आले असून याबाबत अनेक विविध वृत्तपत्र माध्यमातून बातम्या सुध्दा प्रसिद्ध झाल्या आहे. मात्र, प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. यामुळे नागरीकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड चिड निर्माण झाली असून आता आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे.
पेटूर येथील सरपंच व तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रविण झाडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी आज दिनांक २ सप्टेंबर ला सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वणी ते कायर मार्गावर १८ नंबर पुलापर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. सदर रस्त्याचा भार १२ ते १५ टनांपर्यंत असताना ५० टन वजनाचे आयव्हा ट्रक चालतात. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. सदरचे खड्डे चार दिवसांचे आत बुजविण्यात आले नाही,तर सर्व पेटूरवासीयांना घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.