सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : स्माईल फाउंडेशन ही वणी व परिसरात कार्य करणारी सुपरिचित संघटनेने 5 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले असून या स्वातंत्र्य दिनी 6 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 15 ऑगस्ट 2020 मध्ये स्थापित झालेली ही संस्था यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव, झरी या मागास तालुक्यांमधील गरजू आणि उपेक्षित समुदायांना शिक्षण, पर्यावरण संवर्धन, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, शेतकरी आत्महत्या आणि रोजगाराच्या संधी देऊन सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेचे ध्येय आहे की, लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी आणि सशक्त बनवावे. सागर जाधव हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून सहका-यांना सोबत घेऊन ते परिसरात यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे.
स्माईल स्माईल फाउंडेशन चे व्हिजन आहे की, प्रत्येक व्यक्तीला स्वप्नांना बळ देण्याची संधी मिळावी. ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू, उपेक्षित घटकांना सक्षम करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत समानतेच्या तत्वावर आदर्श समाज निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. मिशन अंतर्गत संस्था गरजू समुदायांना शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम करते. झाडे लावणे, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून समाजात बदल घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
संस्थेच्या कार्यात प्रामाणिकता, उत्कृष्टता, नाविन्यता आणि पारदर्शकता हे मूल्ये महत्त्वाचे आहेत. प्रत्येक उपक्रमात नैतिकता आणि प्रामाणिकपणा राखला जातो, तर उत्कृष्टता साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे लोकसहभाग वाढतो आणि पारदर्शक आर्थिक व्यवहार आणि निर्णयप्रक्रियेमुळे संस्थेवर विश्वास निर्माण झाला आहे.
शासनाकडून कामाचा गौरव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एका संस्थेला युवा पुरस्कार दिला जातो. सागर जाधव यांच्या स्माईल फाउंडेशन या संस्थेला 2021-22 या काळातील विविध समाज हिताोपयोगी उपक्रम, युवकांच्या विकासासाठी कार्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. कोरोना काळात स्माईल फाउंडेशनने विविध मदतकार्य केले होते. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना शिधा वाटप, अन्न वाटप केले होते. यासह संपूर्ण वर्ष भर संस्थेद्वारे विविध शैक्षणिक व पर्यावरणविषयक उपक्रम राबवण्यात आले होते.
वणी उपविभाग खनिज संपत्तीने संपन्न असला तरी कोळसा, डोलामाईट आणि चुनखडक खाणींमुळे होणारे प्रदूषण येथील मोठी समस्या बनली आहे. हे क्षेत्र सर्वाधिक प्रदूषित मानले जाते, ज्यामुळे श्वसन आणि इतर आरोग्य समस्या वाढत आहेत. वृक्षतोड आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडले असून, त्यामुळे पर्यावरण संवर्धन हे संस्थेच्या कार्याचा अविभाज्य भाग बनले आहे. झाडे लावणे, पक्षांसाठी घरटे बांधणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि स्वच्छता अभियान राबवून निसर्गाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जातो.
आज 15 ऑगस्ट 2025 रोजी स्माईल फाउंडेशनने 5 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करून 6 व्या वर्षात पाऊल ठेवले आहे. एक छोट्याशा रोपट्यापासून सुरू झालेली ही वाटचाल आज वृक्षात रूपांतरित झाली असून, तिचा विस्तार वणी, मारेगाव, झरी तालुक्यांत पसरला आहे. तुमच्या विश्वास, साथी आणि सहकार्यामुळे हे शक्य झाले. संस्थेचे सदस्य, दानदाते, पत्रकार बंधू आणि सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सोबत कायम आमच्यासोबत राहू द्या !” –
स्माईल एक पहल फाउंडेशनच्या या प्रयत्नांनी स्थानिक समुदायात आशेचा किरण निर्माण झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संस्थेने आपल्या कार्याचा आढावा घेतला असून, पुढील वर्षांतही सशक्त समाज घडवण्यासाठी नवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार सागर जाधव यांनी व्यक्त केला आहे.
सागर जाधव, संस्थापक अध्यक्ष स्माईल (एक पहल)
शैक्षणिक क्षेत्रात संस्था गरजूंना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, वंचित मुलांचे पालकत्व, स्पर्धा आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्रजी कार्यशाळा आयोजित करते. हे उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवतात. महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगाराच्या संधी देऊन समाजातील कमकुवत घटकांना सक्षम करण्यावर भर दिला जातो.