सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : उकणी, निलजई इत्यादी खाण परिसरातील गावातील रस्त्यांची दुरवस्था आहे. रस्त्याची दुरुस्ती तसेच जमीन संपादन, रोजगार, शैक्षणिक सुविधा, शेती नुकसान भरपाई इत्यादी मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे सोमवार, दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी वेकोलि प्रशासनाविरोधात चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. सकाळी 6 वाजता उकणी खाण रोडवरील बसस्टॉप उकणी येथे सकाळी 6:00 वाजेपासून हे आंदोलन सुरु होणार आहे.
उकणी जवळ उकणी, निलजई, जुनाड, नायगाव, कोलारपिंपरी येथे कोळसा खाण आहे. या खाण परिसरात उकणी, पिंपळगाव, जुनाड, बोरगाव, भालर, निलजई, सुंदरनगर, निवनी, बेसा, तरोडा, बेलोरा, नायगाव, कोलारपिंपरी इत्यादी गावे आहेत. या भागातील रस्ते वेकोलिच्या ओवरलोड ट्रकमुळे पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वेकोलि कामगारांना प्रवास करणे धोकादायक व अवघड झाले आहे. शिवाय या मार्गावरून खराब रस्त्यामुळे सातत्याने अपघात होत आहे. यात अनेकांना जीव देखील गमवावा लागला तर अनेक लोक जखमी झालेत.
वेकोलि प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन:
खाण परिसरातील गावातील रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. वेकोलि प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतानाही, गेल्या 10-15 वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. वेकोलि प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन होत असून हा लढा न्याय मिळे पर्यंत सुरु राहणार.
- संजय खाडे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
या आहेत प्रमुख मागण्या:
खाण परिसरात उकणी, पिंपळगाव, जुनाड, बोरगाव, भालर, निलजई, सुंदरनगर, निवनी, बेसा, तरोडा, बेलोरा, नायगाव, कोलारपिंपरी गावांचे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत. उकणी गावातील उर्वरित 15% जमीन तात्काळ संपादित करावी, गावकऱ्यांना वाढीव मोबदला आणि वणी जवळ पुनर्वसन करावे. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, भांदेवाडा खदानातील डोजर, पीसी, डम्पर ऑपरेटरांना पुन्हा नियुक्त करावे. उकणी, पिंपळगाव, जुनाडा, प्रगती नगर येथील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा तर उकणी गावासाठी स्वतंत्र स्कूल बस सुरू करावी. कोळशाच्या धुळीमुळे झालेले नुकसान भरपाई म्हणून शेतक-यांना मोबदला द्यावा.
आंदोलनात सर्व काँग्रेस कार्यकर्ते, नेते, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल, एनएसयुआय, अल्पसंख्यांक, आदिवासी सेल, काँग्रेस समर्थक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे यांनी केले आहे.