सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमीटीच्या मार्गदर्शनात वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगांव, झरी (जामणी) या तिन तालुक्यात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसद्वारे आज दि. 9 ऑगस्टपासून "शेतकरी न्याय यात्रा" काढण्यात येणार आहे. मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथील जनामाय कासामाय मंदिरातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने व स्थानिक आमदाराने चुकीची माहिती देऊन मतदार संघातील जनतेची दिशाभूल केली आहे. त्याची पोल खोलण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ही शेतकरी न्याय यात्रा झरी तालुकाध्यक्ष आशिष कुलसंगे यांच्या नेतृत्वात काढण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेतकऱ्यांना सरसकट व 100 टक्के तेलंगणा राज्याच्या धरतीवर कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोग लागु करावा, शेती साहित्यावरील जीएसटी रद्द करावा, 60 वर्षावरील शेतकऱ्यांना 10 हजाराची पेंशन आणि शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन लागु करावी. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, वणी विधानसभा क्षेत्रातील पिकविम्यापासुन वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा. 24 तास वीज पुरवठा करुन कृषी पंपाचे वीजबील माफ करण्यात यावे. वन्य प्राण्यांपासुन नुकसान टाळण्यासाठी विनामुल्य तार कंपाऊंड द्यावे. या भागातील कोळसा खानी व सिमेंट कंपन्यांमध्ये 80 टक्के स्थानिकांना कामावर घ्यावे. झरी मारेगांव येथे बसस्थानक बांधण्यात यावे. वणी विधानसभा क्षेत्रात मिळणाऱ्या खणीज विकास निधी 65 टक्के या भागातच विकास कामासाठी खर्च करण्यात यावा. वणी मतदार संघातील कोट्यावधी रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याची वर्षभरातच दुरावस्था
झाली आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करुन कमीशन खोरांवर कठोर कारवाई करावी. वणी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने सुरु करावे. खनीज निधीमधून बसविण्यात आलेले वॉटर फिल्टर प्लांटमध्ये भ्रष्टाचार होऊन अल्पावधीतच ते बंद पडले आहे. याचीही चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे बंद पडलेली. एसटी बस सेवा तत्काळ सुरु करावी आदीसह विविध मागण्या घेऊन ही शेतकरी न्याय यात्रा संपुर्ण मतदार संघात फिरणार आहे.
मारेगांव तालुक्यातील वनोजा देवी येथून आज 9 ऑगस्ट पासून यात्रेची सुरुवात होऊन 22 ऑगस्टला वणी येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, माजी आमदार वामनराव कासावार, झरी तालुकाध्यक्ष आशिष कुलसंगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे, वणी शहर अध्यक्ष श्यामा तोटावार, मारेगांव तालुकाध्यक्ष मारोती गोहोकार, वणी तालुकाध्यक्ष पावडे, ओम ठाकुर आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.