सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लाखापूर गावातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून येथील नागरिक चिखलाच्या साम्राजाने त्रस्त झाले आहे. शिवाय अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे रस्ता दुरुस्त व्हावा अशी भाविकांकडून आग्रही मागणी होत आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता तयार होण्याची चातकासारखी ग्रामवासी वाट बघत आहे. मात्र, संबंधित विभागाला जाग येत नसल्याची खंत गावाकऱ्यांकडून व्यक्त होत असून हा रस्ता तयार करून मिळणार कधी? हा सवाल आहे. भांदेवाडा व आकापूर कडे रात्रीच्या सुमारास जड वाहनाची भरधाव वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची चाळण झाली असल्याची काही नागरिकांची मौखिक तक्रार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय आरोग्याचा प्रश्न आहे.
आता पावसाळा जवळ आला असून शाळेला येजा करावयासाठी तसेच भांदेवाडा येथे दर सोळा तारखेला भाविक मोठ्या संख्येने या मार्गांवरून जातात.व इतर कामाकरिता जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र,खराब रस्त्यामुळे आकापूर व भांदेवाडा दर्शनाला जाताना भयंकर त्रास होत आहे. याकडे लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही लक्ष देण्याची आग्रही मागणी लाखापूर व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.