सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : जानकाई (पोड) जिल्हा परिषद शाळेत 1 ते 8 वर्ग आहे. एकूण पटसंख्या 61 असून सद्यस्थितीत एक शिक्षिक अध्यापनाचे कार्य करत आहे. परंतु शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे गटशिक्षण अधिकारी पं.स. मारेगांव यांच्याकडे वारंवार शिक्षकाची लेखी स्वरुपात मागणी केली गेली, मात्र आज पर्यंत शिक्षकाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी आज शुक्रवारला मारेगांव येथे संपूर्ण विध्यार्थी घेवून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांची शाळा भरवली.
तालुक्यातील जानकाई (पोड) येथील जि.प. शाळेतील शिक्षक मागणीच्या संदर्भात अनेकदा निवेदन दिले.परंतु शिक्षकाची पूर्तताच करण्यात येत नसल्याने अखेर आज दि.२/२/२०२४ रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती च्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करून शिक्षकासाठी जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान पंचायत समितीचे प्रांगण कधी न गजबजलेले बघितले असे आज गजबजलेले पाहायला मिळाले. यावेळी शाळेवर तत्काळ शिक्षकाची पूर्तता करून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी आग्रही मागणी पालकांनी लावून धरली होती. तसेच गटशिक्षण अधिकारी शिक्षक देण्यास असमर्थ ठरत असल्याचाही तीव्र संताप गावाकऱ्याकडून व्यक्त करण्यात येत होता.
आज सकाळपासून नुसती चर्चाच रंगत होती. शिक्षक द्या या मागणी साठी सरपंच,पालक व गावकरी शिक्षण विभागाच्या दालनात आक्रमक झाले होते. इकडे पंचायत समिती च्या आवारात ठिय्या मांडून बसलेले विद्यार्थी, शिक्षक मिळाला नाही तर आवारातून हटणार नाही ह्या ते भूमिकेत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासोबत त्यांच्या दालनात पुन्हा चर्चा झाली. ह्या संदर्भात बिडीओ व्हनखंडे यांनाही आमच्या प्रतिनिधिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.
बिईओ ह्यांची सविस्तर चर्चा झाल्यानंतर नियमित शिक्षक आणि शिक्षण स्वयमसेवक ह्या मागणीची आम्ही लवकरच पूर्तता करू, तूर्तास पालकांनी पंचायत समिती च्या आवारातील आजचे आंदोलन मागे घ्यावे, सर्वांच्या उपस्थितीत तथा माध्यमातून गट शिक्षण अधिकारी श्री. एस.ए. काटकर यांनी पालकांना सांगितले. यावेळी त्यांच्या शब्दाला मान देत गावाकऱ्यांनी नम्रपूर्वक आंदोलन मागे घेतलं, परंतु आम्हाला शिक्षक मिळाला नाही तर लवकरच परत आम्ही उपोषणाला बसू असे सर्व पालक यावेळी म्हणाले.
गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर पालकांचे ठिय्या आंदोलन मागे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 02, 2024
Rating: