राजूर बचाव संघर्ष समितीचे वणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी तालुक्यातील राजूर हे गाव कोळसा, चुना व चुना दगड ह्याचे प्रचुर उत्पादन करणारे गाव आहे. परंतु गावात चालणाऱ्या उद्योगांमुळे व व्यवसायामुळे मात्र गावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात वाढ झाली असून गावातील नागरिकांचे आरोग्य धोकादायक पातळीवर पोहोचले असून नागरिकांना दुर्धर आजारांना तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या दोन वर्षात येथे राजूर रेल्वे सायडिंग वर कोळशाची वाहतूक सुरू झाली आहे. येथील कोल वाशरी तून रेल्वे सायडिंग वर मोठ्या ट्रक्स मधून कोळशाची वाहतूक केल्या जाते. रेल्वे सायडिंग वर जमा केलेला कोळसा मशिनद्वारे रेल्वे वॅगन मध्ये भरल्या जाते. हे कार्य रात्रंदिवस केल्या जात असल्याने कोळशाचा धुळीचे प्रचंड साम्राज्य निर्माण होऊन गावात सगळीकडे पसरले आहे. गावातील नागरिकांना श्वास घेताना कोळशाचे बारीक कण त्यांचा फुफुसात जातात व त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दमा, अस्थमा, टी बी व कॅन्सर सारखे दुर्धर आजार झाले आहे.

गावात कोणतेही प्रदूषण निर्माण करणारे उद्योग किंवा व्यवसाय स्थापायचे असेल तर गावातील ग्रामसभेची मंजुरी तथा प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी लागते. परंतु असले उद्योग किंवा व्यवसाय बड्या भांडवलदारांची असल्याने प्रशासन कार्यवाही करण्याऐवजी अशांना मुक संमती देत असते. ह्याचा दुष्परिणाम जनतेला भोगावा लागतो. 

प्रदूषणामुळे राजूर वासियांना मरणयातना भोगावे लागत असल्याने राजूर बचाव संघर्ष समितीचे माध्यमातून संबंधित विभागांना दिनांक १५ फेब्रुवारी २४ ला निवेदन देऊन  प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे नियमानुसार व आदेशानुसार सायडिंग वर स्प्रिंकल्स लावावे, कोळशाचे ढिगारे कमी ठेऊन त्यावर ताडपत्री झाकावी, रस्त्यावर सातत्याने पाणी मारावे, वृक्ष लागवड करावी, प्रदूषणात वाढ करणारे वैध व अवैध कोल डेपो बंद करावे, रींगरोड वर पसरणारी कोळसा ची भुकटी दररोज उचलून रस्ता स्वच्छ ठेवावा, आदी मागण्या उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आल्या आहेत. हे निवेदन देताना राजूर बचाव संघर्ष समितीचे मो. असलम, सुशील अडकिने, कुमार मोहरमपुरी, जयंत कोयरे आदी उपस्थित होते.