शिक्षण स्वयंसेवकाची निवड नियमबाह्य
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जानकाई (पोड) येथील शिक्षण सेवक पदाची भरती नियमबाह्य केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी तक्रार गट विकास अधिकारी यांचे कडे निवेदनातून केली.
तालुक्यातील जानकाई (पोड) येथील शिक्षण स्वयंसेवक पदभरती करण्यात आली. मात्र, सदर पदभरती केलेली उमेदवार ही स्थानिक नसून दुसऱ्या गावातील असून शिक्षण स्वयंसेवक हा जानकाई (पोड) येथील असावा यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात असंही म्हटलं आहे की,शिक्षण स्वयंसेवक उमेदवार जानकाई (पोड) मध्ये असताना सुद्धा मुख्याध्यापक सुजीत ठावरी यांनी जाणीवपूर्वक गावातील शिक्षण स्वयंसेवक डावलून दुसऱ्या गावातील शिक्षण स्वयंसेवकांची निवड केल्याने संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला व गावकऱ्यांना साशंकता निर्माण होत आहे. परिणामी ही निवड नियमाचे उल्लंघन केल्याने आता आपण वरिष्ठांकडे जाऊन दाद मागू असे शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज टेकाम यांनी सांगितले. यावेळी गावातील असंख्य महिला पुरुष उपस्थित होते.
विशेष उल्लेखनीय की, मारेगाव तालुक्यात पेसा अंतर्गत येत असलेल्या अनेक गावात कायद्याला बगल देत भरती केली जात आहे, मागील वर्षी गोंडबुरांडा येथील आशा निवड मध्ये बोगस ठराव दाखवून येथील प्रकार ग्रामस्थांनी उधळून लावला होता, आमरण उपोषण करण्यात आले होते, वरिष्ठाचे पत्र जारी केले तरी देखील अजूनही दोषीवर कारवाई झालेली नाही, आता जानकाई याकडे पोड येथेही असाच प्रकार दिसून येत आहे. प्रशासन लक्ष कां देत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या निवड प्रक्रियेवर न्याय मिळेल का नाही, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.