सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : येथील महसूल पथकाने रेती भरलेल्या 3 ट्रॅक्टर वर गुरुवारच्या मध्यरात्री दीड च्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईने मारेगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली.
तालुक्यातील वर्धा नदी व नाल्याची रेती सर्रासपणे उपसा करीत तस्करांचे अवैध धंदे फोफावले आहे. या गोरखधंद्याने शासनाच्या महसुलला चुना लावाला जात आहे. आपटी, शिवणी, कोसारा, या घाटात वाळू तस्करी जोमात सुरू आहे.
याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने विविध प्रकारे पाऊल उचलले, परंतु तस्करांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून मार्ग काढत अवैध रेती उपसा कायम सुरू ठेवला. यासाठी सांजातील तलाठी यांनी आपले हात ओले करीत तस्करांना मुकसंमती दिल्याची खमंग चर्चा आहे.
यावर आळा कसा घालता येईल, त्यासाठी तहसीलदार दिपक पुंडे यांनी व्यूहरचना आखित सांजातील तलाठ्यांना या कार्यवाही पासून दूर ठेवत इतरत्र तलाठ्यांसह मंडळ अधिकारी ए. वाय. घुगाने यांच्या नेतृत्वात तलाठी सनदेवल कुडमथे, विकास मडावी, विवेश सोयाम यांनी बुधवारच्या मध्यरात्री दापोरा शिवारात अवैधरित्या रेती भरलेल्या 3 ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली. यात दोन ट्रॅक्टर कोसारा येथील सचिन पचारे यांचे तर चिंचमंडळ येथील अतुल पचारे यांचे एक, अशा एकूण तीन ट्रॅक्टर वर धडक कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईने मारेगाव तालुक्यातील रेती तस्कराचे धाबे दणाणले आहे.
मारेगाव तालुक्यातील अवैध धंद्याचा वाढता आलेख पाहता दारू, सट्टा मटका, जुगार, सुगंधित प्रतिबंधक तंबाखू, कोंबड बाजाराने कमालीचे डोके वर काढले आहे. मात्र, येथील संबंधित विभागाकडून एकही कारवाई नसल्याने त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे.
परिणामी तहसीलदार पुंडे यांनी गेल्या काही दिवसापासून पथकात बदल करीत गोपनीय पध्दतीने रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात कारवाईचे फत्ते यशस्वी केले.