सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : शहरातील प्रभाग 13 मधील देशी दारूचे दुकान हटविण्यासंदर्भात तक्रार मागे घेण्याच्या संदर्भात लोकसेवक अनिल उत्तम गेडाम यांना तब्बल नव्वद हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. सदर कारवाई यवतमाळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई आज बुधवारला दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान कान्हाळगाव रोडवर करण्यात आली.
सविस्तर असे की, मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 13 मधील अनिल गेडाम हे विद्यमान नगरसेवक आहे.येथील प्रभागात मागील अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान आहे.सदर देशी दारू दुकान हटविण्यासाठी लोकसेवक यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती.
लोकसेवकाच्या तगाद्याने हतबल झालेल्या अनुज्ञप्ती धारकाने थेट अमरावती/यवतमाळ लाच लुचपत विभागाकडे तक्रार देत आज दि.18 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान, कान्हाळगाव रोड वर अँटी करप्शन ब्युरो पथकाने सापळा रचत लोकसेवक अनिल गेडाम यांना 90 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, ज्ञानेश्वर नालट, अब्दुल वसीम, महेश वाकोडे सचिन भोयर, सुधीर कांबळे, राहुल गेडाम यांनी केली.