सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : तालुक्यात मागील काही दिवसापासून वाघांचे दर्शन होऊ लागले असून,वन्यजीवावर झडप घेता घेता आता मानवावर हल्ला करून ठार करू लागले. याचे ताजे उदाहरण कोलार येथील गुराख्याला ठार मारले,ब्राम्हणी येथील टॉवर चे काम करणाऱ्या मजुराला गंभीर जखमी केले तर, गेल्या आठवड्यात भुरकी येथील 25 वर्षीय युवा शेतकरी असे अनेक प्रकरण लक्षात घेता येईल. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष होण्यापूर्वी या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेलू येथील सरपंच उमेश आसुटकर, राजु मालेकर, शंकर मोहितकर, विनोद आसुटकर, तुकाराम वासेकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत वनपरीक्षेत्र अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनातून केली.
तालुक्यातील वरील घटना ताज्या असतांना आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी सहा वाजता शेलू येथील शेतकऱ्यांना शेलू पुरड शिवारात दोन वाघांचे दर्शन झालेत. त्यात एक वाघ एक पिलू असा समावेश असून पुन्हा दहा ते अकरा वाजता त्याच परिसरात टॉवर चे काम करणाऱ्या कामगारांना तीन वाघ दिसले. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना हातातील कामं सोडून वाघाच्या भीतीपोटी घराची वाट धरावी लागली. दिवसेंदिवस वाघांचे हल्ले वाढले असून शेलू (बु), पुरड येथील गावकरी भीतीच्या सावटात आले आहेत.
परिणामी या मुक्त वावर असणाऱ्या नरभक्षी वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी वनपरीक्षेत्र अधिकारी यांना करण्यात आली आहे. यावेळी शेलू (बु) पुरड परिसरातील नागरिक उपस्थित होते.