विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : सततच्या पावसाने चिंचाळा मार्गावरील पुल पुर्णतःवाहून गेला व आकापुर गावाला जोडणारा दुसरा रस्ता वरुड ते आकापुर हा रस्ता सुध्दा जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे आकापूरच्या लोकांना दैनंदिन कामकाजासह इमर्जन्सी दवाखान्यात जाण्यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनाची वाहतुक करण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्वरित आमच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे अशा आशयचे निवेदन मारेगाव तहसील कार्यालयाला देण्यात आले.
मागील सात दिवसापासून संततधार पावसामुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे आकापूर वासियांना प्रवास करण्यास तसेच शाळकरी व महाविद्यालयीन मुलांना शिक्षणाकरीता जाण्या येण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे सदर गावातील शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापूर्वी परिवहन मंडळाची मारेगांव ते वरुड व आकापुर अशी विद्यार्थ्याकरीता बससेवा सुरु होती. परंतु ती सुध्दा जाण्या येण्याचा मार्ग बंद असल्यामुळे बस सेवा सुध्दा बंद करण्यात आली आहे. ती बससेवा त्वरीत विद्याथ्यांच्या सेवेकरीता चालू करण्यात यावी जेणेकरून गावातील जवळपास ७० विद्यार्थ्यांना प्रवास सुखकर होईल.
निवेदनात नमूद केलेल्या रस्त्याने गावाकऱ्यांना तहसीलच्या कामासाठी मारेगांव येथे आवश्यक कागदपत्रे काढण्याच्या कामाकरीता जावं लागतं. परंतु मागील 6 ते 7 दिवसापासुन या रस्त्याची वाहतूक पूर्णतः बंद आहेत. त्यामळे सर्व कामे ठप्प पडल्याने या बाबीकडे संबंधीत विभागाने लक्ष देवून चिंचाळा ते आकापुर या गावाला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम त्वरीत करून सदर रस्ता वाहतुकीस सुरळीत करून द्यावा अशी मागणी आकापूर ग्रामस्थांनी मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, मा मुख्य कार्य अधिधिकारी, मा बांधकाम विभाग, पांढरकवडा, मा उपविभागीय परिवहन मंडळ वणी, मा गट विकास अधिकारी मारेगाव यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
येत्या आठ दिवसात सदर प्रकरणाची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आकापुर येथील समस्त ग्रामवासी व विद्यार्थी वर्ग मारेगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.
यावेळी नितीन खंडाळकर, हरीश परचाके, चेतन वाघाडे, संतोष सालवटकर, प्रशांत वाढई, कुणाल सालवटकर, राजू बोढे, राजू वाटेकर, संजय वानखडे, रुपेश निखाडे, धनराज भरणे, विजय थेरे, हनुमान सालवटकर, निखिल बोढे आदी सह गावकरी उपस्थित होते.