अधिकारी प्रभार न सोपवता राहतात गायब,जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : यवतमाळच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी गैरहजर असतात व दुर्गम भागाकडे विभागाचे दुर्लक्ष असते असा आरोप करीत झरी जामणी तालुक्यातील संतप्त सरपंचाने अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आरटीओ कार्यालयाबाहेर काढल्या. व ते इथेच न थांबता त्यांनी त्या खुर्च्या चार चाकी वाहनाने (कार) जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन तिथे जमा नेल्या व आरटीओ अधिकारी प्रभार न सोपवता गायब राहतात त्यामुळे नागरिकांची हेळसांड होते अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

झरीजामणी तालुक्यातील अहेरअल्ली ग्रामपंचायतचे सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत हे सोमवारी दुपारी आरटीओ कार्यालयात गेले असता वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याने त्यांनी हा त्रागा केला. झरीजामणी तालुका आदिवासी बहुल असून या भागात आरटीओ विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक समस्या निर्माण असून अपघातात कमालीची वाढ झाली आहे. याठिकाणी नियमित आरटीओ कॅम्प होत नाही. त्यामुळे वाहनांची नोंदणी, वाहनचालक परवाना व नूतनीकरण आदी कामे ठप्प पडली आहे. परिणामी नोंदणी नूतनीकरण न झालेली अनेक वाहने रस्त्यावर धावत आहेत. विनापरवाना वाहन देखील चालविल्या जात असल्याने अपघात वाढले आहे. त्यात ओव्हरलोड वाहतूक व तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी व अन्य तस्करी करणारे अनियंत्रित भरधाव वाहने सुसाट धावत असल्याने लोकांचा जीव धोक्यात आला आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही कारवाई होत नाही अशी तक्रार सरपंच हितेश राऊत यांनी केली आहे. सोमवारी दुपारी आरटीओ कार्यालयात ते आले असता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दोघेही त्यांच्या कक्षात हजर नव्हते. विशेष म्हणजे त्यांच्या तक्रारींचे समाधान करण्यास कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने संतप्त सरपंच हितेश राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून दोघांच्याही खुर्च्या दालनाबाहेर काढल्या. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात कुणालाही प्रभार न देता गैरहजर राहतात. झरी जामणी सारख्या दुर्गम भागातून नागरिकांना वाहनविषयक कामांसाठी आरटीओ कार्यालयात हेलपाटे खावे लागतात, नागरिकांच्या प्रश्नांचे कुठलेही समाधान याठिकाणी होत नसल्यानेच अधिकाऱ्यांच्या खुर्च्या दालनाबाहेर काढून त्या दोन्ही खुर्च्या वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन तिथे तालुक्यातील समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले अशी माहिती हितेश उर्फ छोटू राऊत यांनी दिली. 
अनोख्या कार्यातून नेहमीच चर्चेत

अहेरअल्लीचे युवा सरपंच हितेश राऊत यांनी जनसामान्यांच्या प्रश्नावरून आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी अनेकदा अनोखे कार्य केली. पाटणबोरी ते पाटण या रस्त्याची दुरवस्था आणि स्थानिक अभियंत्यांचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी या मार्गाने अभियंत्यांनी व बांधकाम ठेकेदारांनी परिवारासोबत प्रवास करून दाखवा व पाच हजार रुपये बक्षीस मिळवा या योजनेची जाहिरातच केली होती. पुसद येथे सरपंच परिषदेला संबोधित करणारे प्रशिक्षकच अज्ञानी असल्याचे त्यांनी उघड केले होते. तर अमरावती येथे सरपंच प्रशीक्षण परिषदेत सरपंचांनी केलेल्या प्रश्नाची प्रोसेडीग मध्ये नोंद करून संबोधित करणारे प्रशिक्षक द्वारा प्रश्नांचे निरसन होत नसल्यास आयएएस अधिकाऱ्यांकडून निरसन करण्यात यावे. अशा अनोख्या कार्यातून ते नेहमीच चर्चेत राहतात.
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी काढली समजूत 

आदिवासीबहुल तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेले युवा सरपंच हितेश राऊत यांनी केलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यांची मागणी गांभीर्याने घेण्याची ग्वाही यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी सरपंच राऊत यांना दिली. शिवाय शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्च्या भेट म्हणून स्वीकारण्याचे कुठलेही प्रावधान कायद्यात नाही. त्यामुळे या खुर्च्या साभार परिवहन विभागाला परत करण्यासही त्यांनी सांगितले. अखेर सरपंच राऊत यांनी समजूतदारी घेत त्या खुर्च्या साभार स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पोहोचत्या केल्या.


अधिकारी प्रभार न सोपवता राहतात गायब,जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार अधिकारी प्रभार न सोपवता राहतात गायब,जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार Reviewed by सह्याद्री चौफेर on May 31, 2022 Rating: 5
Powered by Blogger.