स्माईल फाउंडेशन द्वारे पर्यावरण, हवामान बदलाचे धोके आणि आपली भूमिका या विषयावर व्याख्यान संपन्न


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : अलिकडच्या काळात वाढलेले प्रदूषण, वृक्षतोड, पर्यावरणाबाबतची उदासिनता इत्यादींमुळे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असून जर यावर योग्य वेळी उपाययोजना न केल्यास विशेषत: विदर्भातील लोकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकते. असे मत सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ डॉ. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले. ते रविवारी वणीतील विठ्ठल रक्मिणी मंदिरात आयोजित व्याख्यानात बोलत होते. पर्यावरण व हवामान बदलाचे धोके आणि आपली भूमिका या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समाजसेवक विजयबाबू चोरडीया यांच्या मार्गदर्शनात व स्माईल फाउंडेशन वणी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विजय पिदुरकर, दिलीप कोरपेनवार, रमेश बोबडे, मनीष कोंडावार यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पुढे बोलताना डॉ. चोपणे म्हणाले की, मानवाच्या सुखी जीवनासाठी सभोवतालचे वातावरण, पर्यावरण सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. पर्यावरण हा विषय अत्यंत महत्त्वाचा असूनही शिक्षण प्रणालीत पर्यावरण या विषयाला महत्त्व दिले जात नाही व केवळ परीक्षेत पास होण्यापुरतेच याला महत्त्व दिले जाते. भविष्यात विद्यार्थ्यांनी व तरुणाईने पर्यावरणासाठी काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे. असेही आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 

पर्यावरण प्रेमी राजू पिंपळकर यांनी मनोगत व्यक्त करताना ग्लोबल वार्मिंग बाबत चिंता व्यक्त केली. मोठ्या प्रमाणात साठा असलेल्या हिमालयातील हिमखंड सध्या वितळत असून नद्या व भूजल स्रोत आटत आहेत. यावरून भविष्याची कल्पना आपण करू शकतो. त्यामुळे आजपासूनच पर्यावरणाचे संवर्धनासाठी सर्वांनी जनजागृती करणे गरजेच आहे. असे आवाहन त्यांनी केले. तर स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांनी येत्या काळात अधिकाधिक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.  
"भविष्यात असे कार्यक्रम होणे गरजेचे: विजय चोरडिया
वणी परिसर हा  प्रदूषणाने माखलेला परिसर म्हणून ओळखला जातो. प्रदूषणाचा विपरित परिणाम वणीतील प्रत्येक नागरिकांवर होत आहे. त्यामुळे परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करणे व पर्यावरणाचे संवर्धन करणे हाच यावर उपाय आहे. स्माईल फाउंडेशनने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेतला हे कौतुकास्पद असून, पुढे ही केवळ शहरातच नव्हेत तर सर्वच ठिकाणी असे जनजागृतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजे."

-विजय चोरडिया
सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित उपाध्ये यांनी केले तर उपस्थितांचे आभार नारायण गोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पियुष आत्राम, आदर्श दाढे, विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, सचिन जाधव, खुशाल मांढरे, निकेश खाडे, गौरव कोरडे, महेश घोगरे, तन्मय कापसे, तुषार वैद्य, अनिकेत वासरीकर, दिनेश झट्टे, सचिन काळे, कृनिक मानकर, रोहित ओझा, तेजस नैताम, कार्तिक पिदूरकर यांच्यासह स्माईल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
स्माईल फाउंडेशन द्वारे पर्यावरण, हवामान बदलाचे धोके आणि आपली भूमिका या विषयावर व्याख्यान संपन्न स्माईल फाउंडेशन द्वारे पर्यावरण, हवामान बदलाचे धोके आणि आपली भूमिका या विषयावर व्याख्यान संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on May 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.