उच्च शिक्षित वधू वराचा आंतर जातीय विवाह, शहरात उत्तर प्रदेशातून आली वरात !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२७ ऑक्टो.) : मुलं मुली योग्य वयात आल्यानंतर व त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन ते कमावते झाल्यानंतर त्यांच्या विवाहाचा विचार सुरु होतो. विवाह योग्य मुला मुलींचे लग्न जुळविण्याकरिता आधी उचित स्थळ शोधलं जातं. नंतर कुटुंबाबद्दलची व मुलाच्या रहण सहनाविषयीची माहिती घेतली जाते. योग्य स्थळ शोधण्याच्या खटाटोपात वर्ष लोटल्या जातात. पसंत ना पसंतीचा गुंतावळा सुटता सुटत नाही. मेळ जुळता जुळत नाही. मेळ जुळविण्याकरिता कित्येक ठिकाणं पालथी घातली जातात. वर मुलगा शोधण्याकरिता मिळेल त्याच्याकडून माहिती काढली जाते. तरीही नाते जुळून येत नाही. मुलामुलींकडील मंडळी वधूवरांचा व कुटुंबांचा मेळजोड जुळून येण्याकरिता शेकडो स्थळं बघतात. पण एकमेकांत खोट काढण्याची प्रवृत्ती बंधनं जुळून येण्यास बाधक ठरते. परंतु आता उच्च शिक्षित तरुण तरुणींकडून बघण्या शोधण्याच्या रितीरिवाजांना फाटा देत आपला जोडीदार स्वतःच निवडून पालकांच्या संमतीने विवाह जुळून आणली जात आहे. आपल्याच क्षेत्रातील योग्य मुलाची निवड करून नंतर पालकांना त्याच्या बद्दल माहिती देऊन रितसर सर्व सोपस्कार पार पाडली जात आहे. असाच शहरातील बाजोरिया मॅरेज हॉल येथे एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. या आंतर जातीय विवाह सोहळ्याने जातीयता तर बाजूला सारलीच पण प्रांत भेदाच्याही भिंतीही तोडल्या. उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठित कुटुंबातील उच्च शिक्षित तरुणाशी रितीरिवाजानुसार पार पडलेला हा विवाह सर्वांसमोरच एक आदर्श ठेऊन गेला. समतावादी आधुनिक विचारांनी प्रेरित असणाऱ्या तथा वैचारिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या देवतळे कुटुंबातील उच्च शिक्षित तरुणीचा हा विवाह होता. ग्रामीण रुग्णालयातील मेडिसिन विभागातून सेवानिवृत्त झालेले मोरेश्वर देवतळे यांनी समतावादी विचारांची कास कधीच सोडली नाही. सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान राहिले. महापुरुषांच्या विचारांचा नेहमी त्यांच्यावर पगडा राहिला. उच्च विचारसरणी जोपासत विचारांची देवाण घेवाण करण्याचं त्यांचं कार्य अविरत सुरु आहे. मुला मुलीत भेद पाळणाऱ्यांकरिताही त्यांनी आदर्श ठेवला आहे. मुलीच्या शिक्षणात कसलीही कसर बाकी ठेवली नाही. मुलीला उच्च शिक्षित करून त्याच क्षेत्रातील उच्च शिक्षित तरुणाशी तिचे थाटामाटात लग्न लावून दिले. मुलीची आई देखिल उच्च शिक्षित आहे. त्या कायर येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षिका आहेत. उत्तर प्रदेशातील बरेली येथील प्रतिष्ठित कनौजिया कुटुंबातील उच्च शिक्षित तरुणाशी झालेल्या या आंतरजातीय विवाहाने जाती प्रथेला फाटा देत एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. मुलाचे वडीलही उच्च शिक्षित असून ते युपीईएस आहेत. एक आगळावेगळा विवाह म्हणून हा विवाह सोहळा शहरात चर्चिल्या गेला. नवऱ्या मुलीला निरोप देतांना ओटी भरण्याच्या पारंपरिक प्रथेला फाटा देत वधु वरांना भारतीय संविधान देऊन त्यांची बिदाई करण्यात आली. 
लग्न जोडण्याकरिता शेकडो स्थळं बघण्या शोधण्यात वर्ष घालविणाऱ्यांकरिताही हा विवाह सोहळा एक उदाहरण ठरला आहे. लग्न सोहळ्यात उपस्थित असणाऱ्यांकरिता मोरेश्वर देवतळे यांनी महापुरुषांच्या लेखणींनी मानवतेचे विचार पेरणाऱ्या पुस्तकांचा खजिना खुला करून दिला. भारताचे संविधान या पुस्तकासह महापुरुषांचे मानवतावादी विचार लेखणीबद्ध असलेल्या अनेक पुस्तकांचा त्यांनी स्टॉलच उपस्थितांकरिता लावून दिला. असा हा आधुनिक विचारांची जोड असलेला आंतर जातीय विवाह डोळ्याचे पारणे फेरून गेला.
उच्च शिक्षित वधू वराचा आंतर जातीय विवाह, शहरात उत्तर प्रदेशातून आली वरात ! उच्च शिक्षित वधू वराचा आंतर जातीय विवाह, शहरात उत्तर प्रदेशातून आली वरात ! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.