शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत सर्वकाही गमावून बसलेल्या कुटुंबाला जैन व्यापारी बांधवांचा मदतीचा हात

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०५ सप्टें.) : तालुक्यातील नायगांव (खुर्द) येथील राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. घराची राखरांगोळी झाली, संसार उघड्यावर आला, सर्व काही होत्याच नव्हतं झालं. पुन्हा नव्या उमेदीनं घराला आकार देऊन जीवन साकार करण्याचं आव्हान पेलवणारं नव्हतं. संसार उपयोगी साहित्य खरेदी करणं आवाक्याबाहेरचं होत. जळलेलं घर व उजडलेला संसार नव्याने कसा मांडायचा या विवंचनेत कुटुंब आलेलं असतांनाच जैन व्यापारी बांधव या कुंटुंबाच्या मदतीला धावले. सर्व जीवनावश्यक व संसार उपयोगी वस्तू व साहित्य या व्यापारी बांधवांनी आगीची झळ बसलेल्या या कुटुंबाला मदत स्वरूपात देऊन दातृत्वाची ज्योत तेवत ठेवली. जैन व्यापारी बांधवाच्या या मदतीमुळे आगीत सर्वकाही गमावून बसलेल्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. नव्यानं संसार मांडण्याचं सामर्थ्य जैन व्यापारी बांधवांच्या या मदतीमुळे आगग्रस्त कुटुंबाला मिळालं आहे. 

नायगांव (खुर्द) येथील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत राहते घर व घरातील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ११ जुलैला उजाळलेला दिवस धोबे कुटुंबावर अंधकार पसरवून गेला. सकाळी ११.३० वाजता श्रीकांत धोबे यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घराला प्रकाशमान करणाऱ्या विजेने धोबे परिवाराला पुरतं अंधकारात लोटलं. घराची राखरांगोळी झाल्याने अख्ख कुटुंब नैराशेत आलं. आगीच्या ज्वाळांसमोर अश्रूंच्या धारा कमकुवत ठरल्या. पुढे काय हा एकच प्रश्न या कुटुंबाचं डोकं भिन्न करत होता. अशातच गावचे सरपंच दयाशंकर मडावी यांचं हृदय गहिवरलं. त्यांनी या परिवाराला ओढवलेल्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प बांधला. सरपंचांनी घडलेली घटना जैन व्यापारी बांधवांसमोर कथन केली. तसेच या कुटुंबाला मदतीचा हात देऊन त्यांच्या जिवन वाटचालीला आधार देण्याची विनंती केली. सरपंच दयाशंकर मडावी यांच्या विनंतीला मान देऊन वणीतील प्रतिष्ठित जैन व्यापारी बांधवांनी श्रीकांत धोबे यांना त्यांच्या सांसारिक जिवनाकरिता लागणाऱ्या वस्तू व साहित्य मदत स्वरूपात दिले. जैन व्यापारी बांधवांच्या या मदतीमुळे आगीत सर्वकाही गमावून बसलेल्या धोबे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. जैन व्यापारी बांधवांच्या या दातृत्वाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत सर्वकाही गमावून बसलेल्या कुटुंबाला जैन व्यापारी बांधवांचा मदतीचा हात शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत सर्वकाही गमावून बसलेल्या कुटुंबाला जैन व्यापारी बांधवांचा मदतीचा हात Reviewed by सह्याद्री चौफेर on September 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.