सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (८ जुलै) : कोळशाची वाहतूक करणारे ट्रक मुख्य रस्त्यावरच उभे केले जात असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. मुख्य मार्गाच्या दुतर्फा ट्रकांची रांग लागून रहात असल्याने वाहतुकीचा नेहमी खोळंबा होतांना दिसतो. अगदी रस्त्यावर ट्रक उभे केले जात असल्याने वळण घेतांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात. तासंतास रस्त्यावर उभे राहणाऱ्या या ट्रकांवर कार्यवाही न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोळसा खदानींमधून रेल्वे सायडिंगवर ट्रक व ट्रेलरने कोळसा आणला जातो. दररोज असंख्य ट्रक कोळशाची वाहतूक करत असतात. बहुतांश कोल ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे रस्त्यालगतच कॅम्प आहेत. तर काही कोळसा वाहतूकदार रस्त्यावरच ट्रक उभे करून ड्रायवर चेंज व ट्रकचे मेंटेनन्स करतात. त्यांना वाहतूक पोलिसांचा जराही धाक उरला नाही. रस्त्याच्या दुतर्फा ट्रकांच्या रांगा लागलेल्या असतात. लालगुडा चौपाटी पासून तर भाटिया कोल वॉशरी पर्यंत मुख्य मार्गावर जागोजागी ट्रक उभे केले जातात. मुख्य रस्त्यावर तासंतास उभे राहणाऱ्या ट्रकांमुळे रहदारीला अडथळे निर्माण होत असून वाहतुकीचा नेहमी खोळंबा होतांना दिसतो. वणी वरोरा रोडवरील पेट्रोलपंपवर नेहमी ट्रकांची लाईन लागलेली असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक उभे असतात. मागून पुढून येणारी वाहने न बघता सरळ पेट्रोलपंपावर ट्रक नेले जातात. ट्रक चालकांच्या निष्काळजीपणामुळे कित्येक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत.
वरोरा टी-पॉईन्ट नजीक असलेल्या पेट्रोलपंपाला लागूनच एका कोल ट्रान्सपोर्ट कंपनीचा कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये सतत वाहनांची ये-जा सुरु असते. या कॅम्पमध्ये ये-जा करणाऱ्या ट्रकांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे क्रॉसिंग पासून वरोरा टी-पॉईंट पर्यंत रस्त्याच्या दुर्तफा ट्रक उभे केले जात असल्याने याठिकाणी नेहमी ट्रकांच्या रांगा लागलेल्या असतात. रस्त्याच्या दुतर्फा ट्रक उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन येथे नेहमी वाहनांचा जाम लागतांना दिसतो. वणी वरोरा रोडवरील रेल्वे क्रॉसिंग पार होईस्तोर दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात.
रस्त्यावर कुठेही ट्रक उभे करणे व निष्काळजीपणे ट्रक चालविण्यामुळे कित्येक छोट्या वाहनधारकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मनमानी ट्रक उभे करणे व निष्काळजीपणे ट्रक चालविणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.