टॉप बातम्या

अल्पवयीन मुलीचा पिच्छा पुरवून तिला मारहाण करणाऱ्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल




                                                    (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (७ जुलै) : शाळा व महाविद्यालयीन तरुणींचा पिच्छा पुरवून त्यांच्यावर प्रेम लादू पाहणाऱ्या सडकछाप रोमियोंची मजल आता त्यांच्या अंगलट जाण्यापर्यंत जाऊ लागली आहे. विद्यार्थिनींशी जबरन परिचय वाढविण्याकरिता त्यांचा मागोवा करून त्यांना छळले जात आहे. त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याकरिता ही टार्गट मुलं टपोरेगिरीचा अवलंब करू लागले आहे. या रोड रोमियोंना भीक न घालणाऱ्या विद्यार्थिनींना धमकावण्यापासून तर मारहाण करण्यापर्यंत यांच्या हिमंती वाढू लागल्या आहेत. काही विद्यार्थिनी लाजेपायी व यांच्या धमक्यांना घाबरून निमूटपणे त्यांचा छळ सहन करत असल्याने हे सडकछाप मजनू चांगलेच निर्ढावले आहेत. पण काही विद्यार्थिनी या टार्गट मुलांच्या भुलथाप्यात न येता त्यांचे मनसुबे धुडकावून लावत आहे. अशाच एका शाळकरी मुलीने सतत तीन दिवस प्रेमाचा प्रस्ताव घेऊन मागे मागे फिरणाऱ्या मजनूला कसलाही प्रतिसाद न दिल्याने त्याने या अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून केसं ओढून मारहाण केल्याची संताप जनक घटना आज ७ जुलैला सकाळी ११.३० वाजता उघडकीस आली. मुलीने या गंभीर प्रकरणाची पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या रोड रोमियो विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
शहरातील एका खाजगी शाळेत १० व्या वर्गात शिकणारी व आंबेडकर चौक येथे राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी विठ्ठलवाडी येथील एका खाजगी शिकवणी वर्गात शिकवणी करिता दररोज येत जात असते. ४ जुलैपासून एक टार्गट तरुण तिचा पिच्छा पुरवून तिच्याशी ओळखी वाढविण्याकरिता मोबाईल नंबरची मागणी करतो. पण ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. ७ जुलैला हाच तरुण तिला भर रस्त्यात अडवतो व मोबाईल नंबर का देत नाही म्हणून धमकाऊ लागतो. तरीही ती मोबाईल नंबर देत नसल्याचे पाहून तो टपोरेगिरीवर उतरतो व तिचे केस पकडून गालावर झापडा मारतो. जर तू नंबर दिला नाही तर आणखी मार खाशील, अशी धमकीही देतो. या घडलेल्या प्रकाराने धास्तावलेली विद्यार्थिनी हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगते. वडिल क्षणाचाही विलंब न करता मुलीसह पोलीस स्टेशन गाठून या टार्गट तरुणाविरुद्ध तक्रार नोंदवितात. पोलिस प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी शिवा शेगर (२०) रा. रंगनाथनगर याला अटक करतात. वणी वरोरा या प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरील उपविभागीय अधिकारी यांच्या शासकीय बंगल्याजवळ दिवसाढवळ्या हा मारहाणीचा प्रकार घडल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपी शिवा शेगर याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३५४, ड(१)(एक), ३२३, ५०६ व सहकलम १२ बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.
Previous Post Next Post