सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (७ जुलै) : आज विजेच्या कडकडाटासह पाऊसाने तुरळक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. त्यात खातेरा येथील राखनदाराच्या विज पडून २६ ते २७ शेळ्या दगावल्या, तसेच वणी तालुक्यातील वरझडी येथील शेतकरी विज पडून मरण पावला तर दोन जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे सत्र इथेच थांबले नसून इंदिराग्राम (बंदरपोड) येथील आत्राम यांच्या शेतातील काम आटोपल्यानंतर बैलाची जोडी एका झाडाखाली बांधून ठेवली. मात्र अचानक मेघगर्जनेसह पाऊस आला आणि कडाक्याची विज त्या झाडाखाली बांधलेल्या बैलावर पडली आणि दुर्दैवाने शेतकऱ्याचे दोन बैल ठार झाली. इंदिराग्राम (बंदरपोड) येथील शेतकरी वसुदेव गणपत आत्राम असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आत्राम यांच्या शेतातील डवरणीचे काम सुरु होते, सायंकाळी ५ वाजतच्या दरम्यान, पाऊसासह जोरदार कडकडाट सुरु झाला. त्याच वेळी अचानक विज पडल्याने झाडा खाली बांधलेल्या दोन बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन शेतीच्या हंगामात बैल जोडी दगावल्याने शेतकऱ्यांसमोर पुढे शेती वाहायची कशी हा प्रश्न उभा ठाकला आहे.