टॉप बातम्या

संशयास्पद व्यवहार चव्हाट्यावर आणणारा बराटे स्वतःच फसवणूक आणि खंडणीच्या आरोपात अडकला

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (७ जुलै) : अखेर माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बराटेला अटक करण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेला रवींद्र बराटे फरार होता. बराटेंसह त्यांच्या १३ साथीदारांविरोधात पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई सुरू करुन ११ जणांना अटकही केली होती. एकेकाळी राज्यातील मोठ्या नेत्यांच्या जमिनींचे संशयास्पद व्यवहार चव्हाट्यावर आणणारा बराटे स्वतःच फसवणूक आणि खंडणीच्या आरोपात अडकला. याच कारणामुळे त्याला फरार व्हावे लागले.

रवींद्र बराटेला माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. त्याने कित्येक राजकारणी आणि बड्या उद्योजकांना अडकवले आहे. पत्रकार परिषदा घेऊन माहिती जारी करायचा.
त्याच्या माहितीच्या आधारे अनेकांवर कारवाई सुद्धा झाली. पण, याच अधिकाराचा वापर करून त्याने लोकांची फसवणूक, खंडणी आणि बेकायदा सावकारी केली, असे आरोप लागले. जेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा जवळपास साडे तीन हजार कोटींचा मालक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची तयारी सुद्धा पोलिसांनी केली होती.

पुण्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये रवींद्र बराटेच्या विरोधात १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध बेकायदा सावकारी करण्यासह आर्थिक फसवणूक, खंडणी आणि धमकीचे आरोप करण्यात आले. त्यानंतरच तो फरार झाला. सर्वप्रथम पुण्यातील कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये बराटेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यांच्या घरी पोलिसांनी छापे टाकून शेकडो फायली जप्त केल्या. त्यामध्ये राजकारणी व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, शासकीय ठेकेदार यांच्याशी संबंधित असलेल्या फायलींचा समावेश होता.
Previous Post Next Post