सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.१६) : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून शहरातील लॉकडाऊन हटविल्यापासून चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शहरातील विनर्स बियरबार फोडल्याचे प्रकरण ताजे असतानाच काल १५ जूनला शहरालगत असलेल्या चिखलगांव येथील कृषीकेंद्राच्या गोदामाला चोरटयांनी टार्गेट केले आहे. कृषीकेंद्राच्या गोदामाचे शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी शेत बियाणे व धान्यावर हात साफ केला. जवळपास ९६ हजार रुपये किमतीचा कृषी माल चोरटयांनी लंपास केला. १५ जूनच्या रात्री दरम्यान ही चोरीची घटना घडली असून १६ जूनला दुपारी १२.२५ वाजता कृषीकेंद्र चालकाने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरालगत असलेल्या चिखलगांव येथे चंद्रशेखर पांडुरंग देठे यांच्या मालकीचे भूमिपुत्र या नावाने कृषीकेंद्र आहे. १५ जूनला रात्री दरम्यान अज्ञात चोरटयांनी कृषीकेंद्राच्या गोदामाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कृषी केंद्राच्या गोदामामध्ये असलेली ७ क्विंटल तूर किंमत ४२ हजार रुपये व सोयाबीन बियाण्याच्या १४ बॅग किंमत ५४९०० असा एकूण ९६ हजार ९०० रुपयांचा कृषी माल लंपास केला. सकाळी कृषी केंद्र उघडण्यास आलेल्या कृषीकेंद्र चालकास कृषीकेंद्राच्या गोदामात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ पोलिस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. कृषीकेंद्र चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ४६१, ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शहरात मागील काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट चांगलाच वाढला आहे. दुचाक्या लंपास करण्यापासून तर दुकान, कार्यालये फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल वाढल्याचे दिसून येत आहे. आता तर शेतातील साहित्य व कृषी मालांचीही चोरी होऊ लागली आहे. त्यामुळे या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. एकामागून एक चोऱ्यांचे प्रकरणं समोर येऊ लागल्याने पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून लवकरच शहरात धुमाकूळ घालणाऱ्या या भुरट्या चोरांना गजाआड करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार वासुदेव नारनवरे व पोकॉ पुरुषोत्तम डडमल करीत आहे.