अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

                     (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.३) : शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खडबडा मोहल्ला येथे ही घटना उघडकीस आली असून आरोपी हा देखील याच परिसरातील रहिवासी आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आंघोळीकरिता न्हानी घरात गेली की, आरोपी हा चोरून लपून तिला बघायचा. आरोपी हा नेहमी तिला आंघोळ करतांना न्याहाळत असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. १ जूनला दुपारी २ वाजता मुलगी आंघोळी करिता गेली असता आरोपी तिच्याकडे लपून बघत असल्याचे कुटुंबियांच्याही लक्षात आले. परत २ जूनलाही १.३० वाजता मुलगी आंघोळ करण्यास गेली असता आरोपी तिला चोरून लपून न्याहाळतच असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलीला घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठले. खडबडा मोहल्ला येथे राहणारा सिद्धार्थ जनार्धन गायकवाड (३६) हा मुलगी आंघोळ करित असतांना चोरून लपून बघतो, अशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली. २ जूनला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही तक्रार नोंदविण्यात आली. मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी जनार्धन गायकवाड या आरोपीस अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३५४, ३२३, ५०४ व सहकलम १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करीत आहे.