सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.१५) : सूर्योदय झाल्यानंतरही नगर पालिकेचा विद्युत विभाग निद्रिस्त अवस्तेतच रहात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही वार्डातील पथदिवे दिवसाढवळ्याही सुरूच रहात असल्याचे पाहायला मिळत आहे. वीज वितरण कंपनीने नगर पालिकेला वीज बिल आकाराने बंद केल्यागत दिवसालाही विद्युत खांबावरील लाईट सुरूच ठेवले जात आहे. की, नगर पालिकेकडे करापोटी मिळणारा निधी अवास्तव झाला आहे, हेच कळायला आता मार्ग उरला नाही. लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद असल्याने विजेची मोठी बचत झाली आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढविण्याकरिता नगर पालिकेला अकारण वीज खर्ची करण्याची मुभा देण्यात आली आहे की, काय असे वाटू लागले आहे. किंवा नगर पालिकेकडे सेवा करातून मिळणारा निधी जास्त गोळा होत आहे, व कुठल्याही माध्यमातून खर्च वाढावा याकरिता टप्याटप्याने प्रत्येक वार्डातील पथदिवे दिवसालाही सुरु ठेऊन अकारण विजेचा वापर वाढविण्याचा हा प्रकार आहे, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. लॉकडाऊन काळात सेवा करात कुठलीही सूट नागरिकांना मिळाली नाही. उलट सेवा करात कमालीची वाढ झाली. विजेचे युनिट दरही दुपटीने वाढले आहे. नागरिकांना आवाक्याबाहेरचे वीजबिल येत असून ते भरणे नागरिकांना अवघड जात आहे. काटकसरीने वीज वापरतांना नाईलाजास्तव कित्येक कुटुंबांनी एकाच खोलीतील लाईट, पंखा गरजेपुरता सुरु ठेऊन त्या एकाच खोलीत अख्ख कुटुंब रहात आहे. आर्थिक टंचाईमुळे भरमसाठ येणारे विजेचे बिल भरणे अवघड जात असल्याने सामान्य नागरिकांना कमालीची काटकसर करावी लागते. तेच नागरिक जेंव्हा भरदिवसा खांबावरील लाईट सुरु असल्याचे पाहतात, तेंव्हा त्यांच्या भावना अनावर होऊन व्यवस्थेविषयी त्यांच्या तोंडून रोचक शब्द ऐकायला मिळतात. निधी खर्चच करायचा असेल तर विकासकामांवर खर्च करावा, असे दिवसाढवळ्या पथदिवे सुरु ठेऊन वीज बिलाची रक्कम वाढवू नये, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. शहरातील काही वार्डांमधील पथदिवे दिवसाढवळ्या सुरु रहात असल्याचे आढळून आले आहे. नगर पालिकेला याबाबत कळवूनही अधिकारीवर्ग दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहे. भरदिवसा पथदिवे सुरु रहात असल्याची माहिती दिल्यानंतरही पथदिवे बंद केल्या जात नाही. त्यामुळे नगर पालिकेला दिवसाही पथदिवे सुरु राहिल्यास हरकत नसल्याचे वाटत आहे. प्रगती नगर येथील पथदिवे जवळपास सात ते आठ दिवस रात्रंदिवस सुरु होते. तर आज गौरकार ले-आऊट व विठ्ठलवाडी येथील पथदिवे दिवस उजाडल्यानंतरही सुरूच दिसले. तांत्रिक बिघाड आला आहे की, नगर पालिकेचे तंत्र बिघडले आहे, हेच कळेनासे झाले आहे. अकारण विजेचा वापर वाढवून वीजबिलाचा जास्त भरणा करण्यापेक्षा रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा प्रतिक्रिया आता नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.