-प्रशांत चंदनखेडे ~ ९७६७१७३३५३
वणी, (ता.०१ जून) : महागाईचा वाढता आलेख जगणं कठीण करू लागला आहे. सातत्याने वाढणारी महागाई चिंता निर्माण करू लागली आहे. महागाईनं अगदीच उग्ररूप धारण केलं असून सामान्य जनता महागाईनं होरपळून निघाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने सामान्य वर्गाच्या चिंता वाढल्या आहेत. वाढत्या महागाईने सामान्य वर्गाचं कंबरडं मोडलं असून गोर गरीब जनतेच्या उपजीविकेचे प्रश्न निर्माण झाले आहे. महागाईच्या या काळात संसाराचा गाडा हाकतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काटकसरही महागाईपुढे बेअसर झाली आहे. महागाईने सामान्य वर्गासमोर उदर्निवाहाचं संकट निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस हे संकट अधिकच गडद होत चाललं आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना तर नाईलाजास्तव उपास पकडावे लागत आहे. मिळकत कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. काहींच्या हाताला कामे नाही, तर काहींना तुटपुंज्या मिळकतीवर कामे करावी लागत आहे. कोरोना कर्दनकाळ बनून आला, व जीवनाचे संदर्भच बदलले. नागरिकांचं पार अर्थचक्रच बिघडलं. खाजगी क्षेत्रातील नोकरदारवर्ग नोकऱ्या गेल्याने घरीच भाकरी मोडत आहे. जिकडे तिकडे बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. रोजगार कमी व रोजंदार जास्त ही विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या मिळकतीत मिळेल ते काम करायला बेरोजगार वर्ग तयार असल्याने त्यांना कमी वेतनात चांगलेच राबवून घेतले जात आहे. ही तुटपुंजी मिळकत महागाईच्या या काळात पुरेशी पडत नसल्याने कुटुंबाचं पालनपोषण करणं कठीण झालं आहे. कित्येकांना अर्धपोटी उपाशी रहावं लागत आहे. रोगराई व महागाई घेऊन आलेल्या या दृष्टकाळाने जनसामान्यांचं आबाळ झालं आहे. अनपेक्षित महागाईचे आता चांगलेच दुष्परिणाम जाणवू लागले आहे. या वाढत्या महागाईमुळे आता नागरिकांचं जगनचं महागलं आहे. अन्न वस्त्र निवारा या नागरिकांच्या मूलभूत गरजांवरही गदा आली आहे. अन्न धान्यांच्या किमती पेटल्या, वस्त्र महागले तर निवाऱ्यांचे करही दुपटीने वाढले आहेत. आता दाळ मूठभर व पाणी गडवाभर टाकावे लागत आहे. तेलात पाणी मिसळून भाजीची फोडणी द्यावी लागत आहे. डाळींच्या किमती वाढल्या. तेलांच्या किमतीने उचांक गाठला. त्यामुळे काटकसर करतांना गृहिणीही विचाराधीन झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने इकडे गृहिणींचे गणित बिघडले आहे, तर पेट्रोलच्या किमती भडकल्याने गृहस्थांचेही बजेट कोलमडले आहे. पेट्रोल शंभरीपार झालं आहे. त्यामुळे दुचाकीने कुठं जातांना आता शंभरवेळा विचार करावा लागत आहे. गॅस सिलेंडरच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे एकवेळचा सयंपाक चुलीवर तर एकवेळचा सयंपाक गॅसवर करण्याची वेळ आली आहे. जेथे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहे, तेथे वस्त्र खरेदी करण्यास पैसे आणणार तरी कुठून. घराचा कर व पाण्याचा करही दुपटीने वाढला आहे. वीजबिल पाहून तर नागरिकांनाच शॉक लागत आहे. विजेच्या युनिटचे दर भरमसाठ वाढल्याने कितीही काटकसरीने वीज वापरून वीजबिल आवाक्याबाहेरचं येत आहे. अशा या महागाईच्या उद्रेकाने जनजीवन धोक्यात आलं आहे. गोरगरिबांच्या उपजीविकेचे प्रश्न तर निर्माण झालेच आहेत, शासनाचे सेवाकर भरणेही कठीण होऊन बसले आहे. महागाईचा आलेख असाच वाढत राहिल्यास जगण्याच्या संघर्षात विपर्यास झाल्याशिवाय राहणार नाही. डिड वर्ष कोरोनाच्या सावटात गेलं. रोजगार नोकऱ्यातून हात धुवावे लागले. दैनंदिन जीवनात खूप मोठं अंतर आलं. बेरोजगारीचा मार, त्यात महागाईची भरमार, कसा चालवावा संसार, सांगा ना मायबाप सरकार, ही आगतिकता जनसामान्यांतून ऐकायला मिळत आहे. केसाने गळा कापल्याच्या भावना आता नागरिकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहे. चांगल्या दिवसांची वाट पाहतांना आता नागरिकांची खाट उभी झाली आहे. लाचारीचे हुंदके डोळ्याच्या पापण्या भिजवू लागले आहेत. जगण्यासाठी मदत मागण्याची आता आदतच होऊन बसली आहे. कधी जीवन पूर्वपदावर येईल व जगणं सुरळीत होईल, ही आस आता जगण्याच्या विवंचनेत असलेल्या काळजांना लागली आहे.
महागाईने केला कहर, जिवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांचं जगणंच महागलं !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 01, 2021
Rating:
