विशेष पोलीस पथकाने आवळल्या दारू तस्करांच्या मुसक्या

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.६ ) : वणी शहर व तालुक्यातून होणारी दारू तस्करी, अवैध दारू विक्री व अवैध धंद्यांची माहिती मिळवून त्यांच्यावर बेधडक कार्यवाही करण्याकरिता तालुक्यात विशेष पोलिस पथक तयार करण्यात आलं आहे. या विशेष पोलिस पथकानं काल ४ जूनला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास लगतच्या दारूबंदी जिल्ह्यात होणारी दारूची तस्करी उघडकीस आणून तस्करांच्या मुसक्या आवळल्याने दारू तस्करांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. शहरातून दारूबंदी जिल्ह्यात देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या बुलेरो वाहनासह चालक व मालक या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दारू तस्करी वरील धाडीत पोलिसांनी तब्बल १० लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारू तस्करीतील प्यादे हाती लागले असले तरी वजीर मात्र अद्यापही मोकळे आहेत. दारू तस्करीचे मुख्य सूत्रधार गळाला लागणे जरुरी आहे. प्यादे तर बदलतच राहतात. अवैध धंदे बंद करायचे झाल्यास त्याचे मूळ शोधून  मुळावर घाव घालावे लागतील. फांद्या कितीही तोडल्या तरी त्या फुटतच राहतील. जिल्हा पोलिस अधीक्षकांचं विशेष पोलिस पथक अवैध धंद्यांची मुळं शोधण्यात कितपत यशस्वी होतं, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 
विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना चारगाव चौकी मार्गे दारूची तस्करी होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. बुलेरो वाहनातून लगतच्या दारूबंदी जिल्ह्यात अवैधरित्या देशी दारू विक्री करिता नेण्यात येणार असल्याच्या माहिती वरून पोलिसांनी चारगाव चौकी येथे सापळा रचून रात्री १०.४० वाजता वणी कडून घुग्गुसकडे जाणाऱ्या बुलेरो वाहनाला थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले. १८० मिली देशी दारूच्या शिशांचे ७० बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये ४८ नग, एकूण ६० रुपये किमतीचे ३३६० नग किंमत २ लाख १ हजार ६०० रुपये, ९० मिली चे २०० बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये १०० शिश्या, एकूण ३० रुपये किमतीचे २० हजार नग किंमत ६ लाख रुपये, बुलेरो वाहन क्रं MH २९ BE ०१७९ किंमत २ लाख ५० हजार रुपये, एक स्मार्ट फोन किंमत ५ हजार रुपये, एका साधा फोन किंमत १ हजार रुपये असा एकूण १० लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी हरीश पुरुषोत्तम तिरणकर (२२) रा. कोरंबी (मारेगाव) व नंदेश्वर तात्याजी काळे (२७) रा. जगदंबा देवस्थान गणेशपूर ता. वणी यांना अटक केली आहे. त्यांच्यावर म. दा. का. च्या कलम ६५ (अ)(ई), सहकलम १३०(१), १७७ मो.वा. का. नुसार गुन्हा दाखल केला केला आहे. 
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे, विशेष पोलिस पथकाचे राजू नायक, मुकेश करपते, मिथुन राऊत, बागेश्वर, वाहन चालक महेश यांनी केली.
विशेष पोलीस पथकाने आवळल्या दारू तस्करांच्या मुसक्या विशेष पोलीस पथकाने आवळल्या दारू तस्करांच्या मुसक्या Reviewed by सह्याद्री चौफेर on June 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.