सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
चंद्रपूर : दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका केवळ शेतीला नव्हे, तर मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांनाही बसत आहे. तलावांमधील पाणीसाठा घटल्याने माशांचे संगोपन आणि उत्पादन प्रभावित झाले असून, मच्छीमार सहकारी संस्था व त्यांच्या नोंदणीकृत सदस्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या संकटात मत्स्यव्यवसाय बांधवांना दिलासा मिळावा आणि त्यांनी केलेली गुंतवणूक वाया जाऊ नये, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे विशेष आर्थिक मदत मंजूर करण्यासह बाधित तलावांचे चालू वर्षाचे भाडे पूर्णतः माफ करण्याची मागणी केली आहे.
मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी शासनाकडून ठोस मदत मिळावी, त्यांच्या कष्टाची आणि गुंतवणुकीची हानी भरून निघावी, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छीमार बांधवांच्या व्यथा शासनदरबारी मांडत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अनेक तलावांमधील पाण्याची पातळी खालावली आहे. मच्छीमार सहकारी संस्थांनी तलाव भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये मत्स्यबीज अर्थात बोटुकली सोडण्यासाठी तसेच माशांच्या संगोपनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. मात्र, पाणीसाठा कमी झाल्यामुळे मत्स्यसंवर्धन आणि उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी, बोटुकली खरेदी, मत्स्यसंवर्धन आणि तलावभाड्यासाठी केलेला खर्च भरून काढणेही कठीण झाले आहे. उत्पन्न घटल्याने या संस्थांसह त्यांच्या सदस्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांच्या अडचणींचा विचार करून शेतकऱ्यांप्रमाणे मदत मिळावी, अशी आग्रही भूमिका आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.मत्स्यमारी करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा दर्जा देण्याच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत, नैसर्गिक परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या मत्स्यव्यवसाय बांधवांना आर्थिक मदत व आवश्यक सवलती देण्यासाठी शासनाची तरतूद आहे. या तरतूदनुसार सकारात्मक आणि विशेष धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली आहे.
या मागणीच्या अनुषंगाने बाधित तलावांचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, बोटुकली खरेदी व मत्स्यसंवर्धनासाठी केलेली गुंतवणूक आणि उत्पन्नातील घट विचारात घेऊन बाधित मच्छीमार सहकारी संस्था व त्यांच्या नोंदणीकृत सदस्यांना विशेष आर्थिक मदत मंजूर करावी, तसेच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बाधित तलावांचे चालू वर्षाचे भाडे पूर्णतः माफ करावे, अशी भूमिका आ.सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात मांडली आहे. याशिवाय, मदतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
नैसर्गिक संकटामुळे मच्छीमारांनी वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी केलेली मेहनत आणि गुंतवणूक धोक्यात आली असताना, त्यांना केवळ आश्वासनांवर अवलंबून राहावे लागू नये, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळावी, ही आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मत्स्यव्यवसाय बांधवांनाही संकटाच्या काळात शासनाचा भक्कम आधार मिळावा, त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहावे आणि मत्स्यव्यवसाय पुन्हा उभारी घेऊ शकेल, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे हा प्रश्न ठामपणे मांडला आहे.

