सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील नांदेपेरा येथे विषारी औषध प्राशन केल्याने ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रविंद्र चरणदास शिरपुरकर यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र शिरपुरकर यांनी १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास नांदेपेरा येथील हनुमान मंदिराजवळ विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, वणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे नांदेपेरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दुर्गा रविंद्र शिरपुरकर (३५), मुलगा रुद्र (५) आणि मुलगी सिद्धी (३) असा परिवार आहे.
घटनेप्रकरणी संबंधित यंत्रणेकडून पुढील कार्यवाही सुरू असून, मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे.


