टॉप बातम्या

डब्ल्यूसीएल अप्रेंटिस प्रशिक्षणार्थींचे संविधान चौकात आंदोलन; रोजगाराची ठोस मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

नागपूरडब्ल्यूसीएलमधील विविध विभागांत ट्रेड अप्रेंटिसचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्याच्या आधारे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागणीसाठी

भारतीय अप्रेंटिस संघाच्या वतीने संविधान चौक, नागपूर येथे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार निर्मलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.

आंदोलनादरम्यान प्रशिक्षणार्थींनी डब्ल्यूसीएल प्रशासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. गेल्या चार ते पाच वर्षांपासून अप्रेंटिसच्या नावाखाली प्रशिक्षणार्थींकडून प्रत्यक्ष ट्रेड प्रशिक्षणाऐवजी कामगारांप्रमाणे काम करून घेण्यात आले, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. प्रशिक्षणार्थींच्या हक्कांचे व अधिकारांचे उल्लंघन करण्यात आले असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्यांच्या रोजगाराचा प्रश्न प्रलंबित असल्याचे संघटनेने म्हटले.

एसीसीएल, छत्तीसगड येथील प्रशिक्षणार्थींना आंदोलनानंतर मिळालेल्या रोजगाराच्या संधीचा संदर्भ देत, त्याच धर्तीवर डब्ल्यूसीएलमधील पात्र अप्रेंटिस प्रशिक्षणार्थींनाही तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात डब्ल्यूसीएलच्या महाप्रबंधकांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलनानंतर डब्ल्यूसीएल हेडक्वार्टर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथील महाप्रबंधक कार्यालयात तसेच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

 जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, संबंधित केंद्रीय व राज्य मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे प्रशिक्षणार्थींच्या रोजगाराच्या प्रश्नाबाबत निवेदन व पत्रव्यवहार करण्यात आला.

या आंदोलनात भारतीय अप्रेंटिस संघाचे पदाधिकारी व प्रशिक्षणार्थी गणेश ताजने, विपुल काशिवार, गोपाल हंबर्डे, दिनेश राऊत, सौरभ निनावेकर, प्रमोद तुरकर, श्रेयस माकडे, रूशान अली, अमन कावळे, वैष्णवी देठे, पायल कामडी, निखिल सोनटक्के, रोशन सोनटक्के, कुणाल वऱ्हाटे, सूर्यकांत वांढरे, निशांत पेंदाम, कुणाल कोरांगे, अक्षय बोढने, अंकुश कोवे यांच्यासह डब्ल्यूसीएलच्या विविध विभागांतील हजारो प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अप्रेंटिस युवक-युवतींच्या रोजगाराचा प्रश्न गांभीर्याने सोडवून त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराची संधी मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी भारतीय अप्रेंटिस संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();