सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : महाराष्ट्र शासनाच्या राज्य योजना अंतर्गत निसर्ग व पर्यटन विकास योजनेतून वणीजवळील निंबाळा येथे मंजूर करण्यात आलेल्या 'रुद्राक्ष वन' प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून रखडले असून, ते तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी माजी उपसभापती तथा लढा संघटना वणी महिला अध्यक्षा सौ. वृशालीताई प्रवीण खानझोडे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी विभागीय वन अधिकारी (DFO), पांढरकवडा यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केले आहे की, या प्रकल्पामुळे परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. मात्र, प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होऊनही कामाची गती अत्यंत मंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रकल्पाच्या कामाचा दर्जा, खर्च तसेच सद्यस्थितीची चौकशी करून उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पर्यटन विकास समिती, उपविभागीय अधिकारी (SDO) व स्थानिक लोकप्रतिनिधींनाही पाठविण्यात आल्या आहेत.
सामाजिक व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

