सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वारकरी संप्रदायाची पताका संपूर्ण देशभर पसरविणारा क्रांतिकारी संत म्हणजे संत नामदेव महाराज. महाराष्ट्र पासून ते पंजाब पर्यंत वैष्णव धर्म म्हणजे काय हे सर्वसामान्यांना पटवून देणारे संत म्हणजे नामदेव महाराज होते असे उद्गार ह.भ. प. प्रवीण महाराज काटकर यांनी काढले. ते दि. 11 ऑगस्टला मार्डी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था द्वारा आयोजित ६७६ वा संत शिरोमणी श्री.नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा कार्यक्रमामध्ये उद्बोधन करीत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदर्भ शिंपी समाजाचे कार्याध्यक्ष मोरेश्वर उज्वलकर, मार्गदर्शक म्हणून उदयपाल महाराज वणी, सुरेश किटे, सरपंच रविराज चंदनखेडे मार्डी, पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, देवराव जुमळे, अनिल जुमळे, विजयाताई दहेकर, ग्रामगीताचार्य तथा महिला सेवाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ यवतमाळ जिल्हा,श्रीकांत बहादे, सुरज येवले, प्रसिद्धीप्रमुख गुरुदेव सेवा मंडळ, सुरेश चांगले, वर्षाताई संजय कोहळे, जळका वच्छलाबाई वाढई वणी उपस्थित होते.
यावेळी कीर्तनामध्ये हभप काटकर महाराजांनी सांगितले की संत नामदेव महाराज यांच्या साहित्यात त्यांच्या अभंग रचनेमध्ये विठ्ठल भक्ती ओतप्रोत भरलेली होती. सर्वसामान्यांना समजेल अशा सुलभ भाषेमध्ये अध्यात्म व भक्तीचा संदेश दिला. महाराष्ट्रासह त्यांनी उत्तर भारतातही भागवत धर्माचा प्रसार केला. "अमृताहुनी गोड नाम तुझे देवा" या ओवी मध्ये तर भगवंताविषयीचे उत्कट प्रेम व्यक्त होते. वैष्णव पंथाचा प्रचार प्रसार करीत समाजामध्ये जनजागृती निर्माण केली. तसेच समाजात वैचारिक क्रांती करणारा एकमेव संत म्हणजे संत नामदेव महाराज. काटकर महाराज यांच्या कीर्तनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय देत त्यांच्या बद्दलची माहिती सांगितली.
यावेळी गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी तसेच यवतमाळ येथील गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनिल जुमळे, किशोर जुमळे, पांडुरंग तुरंगे, किशोर तुरंगे, रत्नाकर जुमळे, अभय जुमळे, दिलीप सहस्त्रबुद्धे, अनंता जुमळे, मोहन तुरंगे, प्रफुल चौधरी, संतोष जुमळे, आनंद जुमळे यांचे सह अनेकांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संचालन सुनील देऊळकर, प्रास्ताविक सुरेश किटे तर आभार गजानन पालकर यांनी मानले. कार्यक्रमाला वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील सर्व समाज बांधव तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


