सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मार्डी मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे प्राण पत्रकार निलेश चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे वाचल्याची घटना घडली आहे. या मानवतावादी कार्यामुळे परिसरात पत्रकार निलेश चौधरी, राज घायवान, प्रवीण गावंडे आणि अमोल मोडक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथून वडकी जवळील येडशी गावाकडे मामा-भाची दुचाकीने निघाले होते. प्रवासादरम्यान रात्रीचा अंधार झाल्याने आणि दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश अत्यंत कमी असल्यामुळे रस्त्यावरील मोठा खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही. त्यामुळे दुचाकी थेट खड्ड्यात गेल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात निलेश गेडाम यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते.
याचवेळी काही कामानिमित्त वणी येथून त्याच मार्गाने जात असलेले पत्रकार निलेश चौधरी, राज घायवान, प्रवीण गावंडे आणि अमोल मोडक यांना रस्त्याच्या कडेला सुमारे १२ ते १३ वर्षांची आचल मडावी, मुलगी रडत बसलेली दिसली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत त्यांनी कोणताही विलंब न करता वाहन थांबवले आणि आचलकडे धाव घेतली.
विचारपूस केल्यानंतर बाजूला तिचे मामा निलेश गेडाम गंभीर जखमी अवस्थेत पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी निलेश गेडाम यांना स्वतःच्या वाहनात बसवून मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे जखमीच्या जीवाला मोठा आधार मिळाला. या घटनेत पत्रकारांनी केवळ वृत्तांकनाची भूमिका न बजावता सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचे दर्शन घडविले. त्यांच्या तत्परतेमुळे एका गंभीर जखमी व्यक्तीला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली, तर घाबरलेल्या अल्पवयीन मुलीलाही मोठा आधार मिळाला.
स्थानिक नागरिकांनी पत्रकार निलेश चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या धाडसी आणि संवेदनशील कृतीचे मनापासून स्वागत करत, “खरा पत्रकार तोच, जो संकटाच्या क्षणी समाजाच्या मदतीला धावून जातो,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले.