सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : काही महिन्यांपूर्वीच शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले दयाल रोगे यांच्यावर पक्षाने आता महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविली आहे. दयाल रोगे यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या तालुका मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रफुल चव्हाण, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, वणी नगराध्यक्षा सौ. विद्याताई आत्राम आणि किसान मोर्चाचे ज्येष्ठ नेते दिनकर पावडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष पवन एकरे, वणी तालुका अध्यक्ष प्रदीप जेजुरकर, शंकर लालसरे, माधव कोहळे, ज्ञानेश्वर चिकटे, मारोती गौरकार माला गौरकार, रमण डोये,शोभा नक्षणे, शालिनी दारुण्डे, मनीषा बोढाले आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती लाभली.
१६ ऑगस्ट २०२६ रोजी भाजपा मारेगाव तालुकाध्यक्ष तथा लोकप्रिय नेतृत्व मा. अविनाश लांबट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात दयाल रोगे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
दयाल रोगे यांनी काही महिन्यांपूर्वी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर अल्पावधीतच त्यांच्यावर महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या पक्षातील सक्रियतेची दखल घेतल्याचे मानले जात आहे.
ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना पक्षाच्या विचारधारेसोबत जोडणे, कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करणे तसेच पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता दयाल रोगे यांच्यावर राहणार आहे.
अविनाश लांबट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात झालेल्या या नियुक्तीमुळे दयाल रोगे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.