सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील चोरंबा या छोट्याशा गावातून एक मोठी प्रेरणादायी यशोगाथा समोर आली आहे. वैदेही बंडू तोडसाम हिने CBSE १० वीच्या परीक्षेत ८९.३३% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून, अशा प्रकारचे यश मिळवणारी ती गावातील पहिलीच मुलगी ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा येथील विद्यार्थिनी असलेल्या वैदेहीने आपल्या जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. मर्यादित साधनसामग्री असतानाही तिने शिक्षणाला प्राधान्य देत आपले ध्येय गाठले, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे.
या यशामागे तिच्या आई-वडिलांचा सततचा पाठिंबा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विशेषतः श्याम मेश्राम सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेने वैदेहीने कठोर परिश्रम करत हा टप्पा गाठला.
वैदेहीची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत असून, “परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळते,” हा संदेश ती देऊन गेली आहे.
तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सह्याद्री चौफेर परिवारातर्फे वैदेहीला शुभेच्छा!!