सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : नगर पंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात शहरवासीयांनी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता (मार्डी चौक, मारेगाव येथे होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या आंदोलनामागे शहरातील अनेक प्रलंबित व गंभीर प्रश्न असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी घरकुल योजनेच्या जी.आर.नुसार पट्टे देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी आहे. तसेच अनधिकृत ले-आऊट धारकांना अधिकृत करून संबंधित नागरिकांच्या नावावर जागा हस्तांतरित करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, बांधकाम कामगारांच्या फाईल्सवर नगर पंचायत प्रशासनाकडून सह्या करण्यात याव्यात, तसेच शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबाबत चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
शहरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.