सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे आयोजित भव्य जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभावी भाषण करत उपस्थितांना संबोधित केले. हजारोंच्या संख्येने महिला-पुरुष, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहिल्याने मैदान खचाखच भरले होते.
26/11 मुंबई हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आज संविधान दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. विश्व रत्न डॉ बाबासाहेबांचे संविधान हा देशाचा आत्मा आहे. संविधान पाळणे हीच आपली राष्ट्रधर्माची प्रेरणा आहे. डॉ बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र आजही तितकाच मार्गदर्शक आहे.”
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला नवे बळ मिळत असल्याचे सांगत त्यांनी विकासकामांवरील भर अधोरेखित केला.
यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी वणी नगरपरिषदेसाठीच्या सर्व उमेदवारांचा परिचय करून देत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कु. पायल तोडसाम आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलला मनापासून शुभेच्छा दिल्या. “ही संपूर्ण टीम प्रचंड मतांनी विजयी करा,” असा उत्साहवर्धक संदेश त्यांनी नागरिकांना दिला.वणी शहरातील अनेक समस्याचे निराकरण करण्यासाठी शिवसेनाचा झेंडा फडकवा असेही ते म्हणाले. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात विजयाचा शंखनाद फुंकला.
सभेला पालकमंत्री संजय राठोड, शिवसेनेचे हरिहर लिंगनवार, विजय चोरडिया, विनोद मोहितकर, मनीष सुरावार यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उत्साह, घोषणाबाजी आणि प्रचंड गर्दीमुळे वणी शासकीय मैदान राजकीय ऊर्जेने भारावून गेले होते.
