सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मुंबई : वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात एक देश-एक निवडणूक या संकल्पनेला मंजूरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणतात की, भारताने जगाला सशक्त आणि बळकट अशा लोकशाहीचा धडा घालून दिला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत आधुनिक आणि चांगले बदल स्वीकारणे हे काळानुरूप आवश्यकही ठरते. आम्ही या वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेला सुरवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. त्याबाबत यापुर्वीच केंद्राला पत्र पाठवून पाठिंबा दिला होता. त्यामुळे या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले पाऊल क्रांतिकारक ठरणार आहे.
दीर्घकालीन आणि वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे पैसा, वेळ आणि मनुष्यबळांचे श्रम वाचणार आहेत. वेगवेगळ्या निवडणुकांमुळे आचारसंहितेचा प्रक्रीया राबवावी लागते. या काळात विकास कामे थांबतात. त्यामुळे विकासाचा वेगच मंदावतो. हे सगळे टाळण्यासाठी या निर्णयाचे स्वागतच करावे लागेल. वेळ आणि पैसा वाचणार असेल, तर या निर्णयाचा विरोध करणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 19, 2024
Rating: