आज वणीत मनसेचा रोजगार महोत्सव

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : सुशिक्षित आणि कुशल युवक- युवतींना उत्तम करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून रोजगार महोत्सवाचे आयोजन आज रविवार ला करण्यात आले आहे.
विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी मतदारसंघात 18 पेक्षा जास्त कोळसा खानी आहेत, तर त्यावर आधारित अनेक कंपन्या व उद्योग आहेत. तरी सुद्धा अनेक सुशिक्षित युवक रोजगारापासून वंचित आहेत.

मनसे अंतर्गत मागील 2 महिन्यांपासून पक्षाकडून वणी उपविभागीय क्षेत्रात या रोजगार महोत्सवासंदर्भात प्रचार प्रसार करण्यात आला. तसेच अधिकाधिक बेरोजगारांच्या नोंदण्या यामध्ये करण्यात आल्या. वणी, मारेगाव व झरी तालुक्यात विविध ठिकाणी मार्गदर्शकाकडून मुलाखत पूर्व प्रशिक्षण देण्यात आले. आता या महोत्सवाचा अंतिम टप्पा म्हणून आज रविवार 3 डिसेंबरला वणी येथील एसपीएम हायस्कूलच्या प्रांगणात या अर्जदारांची सहभागी कंपन्यांकडून मुलाखत घेतल्या जाणार आहे. देशातील 70 पेक्षा अधिक उद्योग, सेवा आणि खासगी क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. सकाळी 8.00 वाजतापासून मुलाखती घेण्यात येणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांना येथे प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या रोजगार महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.