कोरोनाची साथ, का सोडत नाही साथ, कोरोनाच्या लाटांनी अडविली शिक्षणाची वाट

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : कोरोना हा साथीचा आजार आता नेहमीसाठीचा साथी झाला आहे. कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कोरोना मात्र साथ सोडायला तयार नाही. त्याला निरोप देण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला, पण त्याचा मुक्काम वाढतच आहे.

कोरोनापासून मुक्त होण्याकरिता काय काय नाही केले, तरी पण तो दूर जायला तयारच होत नाही. तो मानवाच्या शरीराच्या ज्या इंद्रियाशी परिचित आहे, तो मुखवटा सुद्धा झाकला. पण तरीही तो माणसाला ग्रासतच आहे. तो नकळत तळ हातावर बसू नये म्हणून हातही वारंवार धुतले, पण त्याने काही साथ सोडली नाही. तो घातक ठरत असल्याचे पाहून त्याचा खात्मा करण्याकरिता त्याच्यावर रासायनिक फवारण्या केल्या. त्यानंतर तो काही काळ माणसांपासून दूर तर गेला, पण आणखी दोन व्हेरियन्ट आपल्या सोबत घेऊन आला. शेवटी त्याच्या पासून बचावाकरिता लसींचे कवच घातले. पण तरीही कोरोनाचे आक्रमण सुरूच आहे. आता तर त्याने थैमान घालणे सुरु केले आहे. त्यामुळे लोकांच्या मुक्त वावरण्यावर निर्बंध लावले जाऊ लागले आहे. कोरोनाच्या सावटात परत दैनंदिन जिवन विस्कळीत होऊ लागलं आहे. कोरोनाने लय पकडली की, नियम बंधनं लावणं सुरु होतं, व सर्वप्रथम शाळेलाच कुलूप लावलं जातं. राजनीतिक सत्काराचे कार्याक्रम, मेळावे, सोहळे, मनोरंजनाची माध्यमं, बाजारपेठ सर्व काही जैसे थे सुरु आहे, पण बंद केल्या जातात फक्त शाळा. शाळा महाविद्यालये सुरु असली की, कोरोना वाढतो, ही धारणाच होऊन बसली आहे. दोन वर्ष कोरोनाच्या सावटात गेल्यानंतर आता कुठे जेमतेम शाळा सुरु झाल्या होत्या. त्यात कोरोनाची तिसरी लाट उसळली, व खबरदारीचा उपाय म्हणून आधी शाळांनाच टाळे लावण्यात आले. त्यामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणात हळू हळू रममाण होऊ लागलेल्या विद्यार्थ्यांची शाळा महाविद्यालये बंद झाल्याने चांगलीच निराशा झाली आहे. कोरोनामुळे वेळोवेळी शाळा बंद कराव्या लागत असल्याने विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. 
पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरु झालं, व चिमुकल्यांच्या हातांमध्ये मोबाईल आलेत. सर्वसामान्य पालकांसमोर आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मोबाईलचा प्रश्न उभा झाला. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना शिकणं व पालकांना शिकवणं अवघड जाऊ लागलं आहे. मासिक शुल्काबरोबर मोबाईल रिचार्जचाही खर्च पालकांना उचलावा लागत आहे. ऑनलाईन शिकवणीत नेटवर्क जाण्याचे अडथळे निर्माण होत असल्याने मुलांना शिक्षकांच्या शिकवणीतील काही बाबी कळतच नाही. त्यामुळे कोरोनाची लाट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची वाट लावत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची साथ निवळल्यानंतर जिवन पूर्वपदावर येऊ लागलं, व दिर्घ कालावधीनंतर शाळाही सुरु करण्यात आल्या. दोन वर्ष घरात कोंडून ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेची वाट धरता आली. शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्यापासून तर होमवर्क कारण्यापर्यंतच्या वेळा ठरल्या. शाळेत शिक्षकांकडून मिळणाऱ्या योग्य मार्गदर्शनामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू लागला असतांनाच व ते शाळेतील शैक्षणिक वातावरणात रमू लागले असतांनाच परत कोरोना आडवा आला, व खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रथम शाळांनाच टाळे लावण्यात आल्याने विद्यार्थी कमालीचे निराश झाले आहेत.

कोरोनाच्या येणाऱ्या लाटांमुळे शाळा बंद कराव्या लागत असल्याने विद्यर्थ्यांचं शैक्षणिक जीवन धोक्यात येऊ लागलं आहे. शाळा बंद रहात असल्याने काही विद्यार्थी तर शिक्षणापासूनच वंचित राहू लागले आहेत. त्यामुळे योग्य शिक्षणाअभावी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची वाट धूसर होऊ लागली आहे. तेंव्हा शिक्षणाची कास सुटणार नाही , याचीही काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
कोरोनाची साथ, का सोडत नाही साथ, कोरोनाच्या लाटांनी अडविली शिक्षणाची वाट कोरोनाची साथ, का सोडत नाही साथ, कोरोनाच्या लाटांनी अडविली शिक्षणाची वाट Reviewed by सह्याद्री चौफेर on January 13, 2022 Rating: 5
Powered by Blogger.