पात्र असूनही का मिळाले नाही घरकुल, हा प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला गदारोळ


सह्याद्री न्यूज  नेटवर्क | 

वणी : तालुक्यातील चिचमंडळ ग्रामपंचायतेंतर्गत घेण्यात आलेली ग्रामसभा घरकुलाच्या मुद्यावरून चांगलीच गाजली. ग्रामस्थांनी ग्रामसभेत प्रस्तावित घरकुलाचा मुद्दा उपस्थित करून ग्रामसचिवांना चांगलेच धारेवर धरले. गरजू लाभार्थ्यांना घरकुलं मंजूर न झाल्याने ग्रामवासी कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ६ सप्टेंबर २०१६ ला झालेल्या ग्रामसभेत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाकरिता पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून ती सर्वानुमते ठराव घेऊन पारित करण्यात आली. पण घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांच्या यादीतून अती गरजू लाभार्थ्यांनाच डावलण्यात आल्याचा आरोप ७ जानेवारीला घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केला. त्यावेळी ग्रामसभा अध्यक्ष म्हणून दिवाकर सातपुते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. ज्यांना खऱ्या अर्थाने घरकुलाची आवशक्ता आहे, त्यांना मात्र घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवले जात असल्याची खंत ग्रामस्थांनी ग्रामसभेत व्यक्त केली. कित्येक गरीब गरजवंत घराचं स्वप्न डोळ्यात साठवून असतात. घरकुलाचा लाभ मिळेल, व हक्काचं घर बांधू ही आतुरता त्यांना लागलेली असते. पण घरकुलाच्या यादीतून गरजूंचीच नावे वगळण्यात येत असल्याने ते हवालदिल होतात, व त्यांचं घरकुलाचं स्वप्न त्यांच्या डोळ्यातच राहतं. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुलाकरिता पात्र असलेले लाभार्थी पात्रता यादीतून वगळले जात असल्याने वर्षानुवर्ष त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होतांना दिसत नाही. यावरून ग्रामस्थांनी सचिवावर चांगलाच प्रश्नांचा भडीमार केला. 

मार्च २०१६ मध्ये चिचमंडळ ग्रामपंचायतेमध्ये ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत घरकुलासाठी १८० लाभार्थ्यांची निवड करून त्यांची यादी तयार करण्यात आली. १८० ही पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळवून देण्याचा ठराव घेण्यात आला. या ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून दिवाकर सातपुते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतेने घरकुलासाठी पात्र असलेल्या सर्व १८० लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे पाठविली. या १८० लाभार्थ्यांमधून ३० लाभार्थ्यांची नावे हेतुपुरस्सरपणे गहाळ करण्यात आली. २७ लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले. दोन लाभार्थ्यांची निवड चुकीची ठरवली. १२१ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले. ज्यांची कुडाची घरे आहेत, जे अपंग आहेत, ज्या महिला विधवा आहेत व जे गरीब गरजू आहेत, त्यांची नावे पात्रता यादीतूनच गायब करण्यात आली. आणी ज्यांना आधी घरकुलाचा लाभ मिळाला आहे, अशाच कुटुंबातील अनेकांना घरकुलाकरिता पात्र ठरविण्यात आले. १८० पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती कडे पाठविण्यात आली होती, मग १२१ लाभार्थीच घरकुलासाठी पात्र का ठरले, हा प्रश्न ग्रामस्थ व ग्रामसभा अध्यक्षांनी ग्रामसचिवाला विचारला असता त्यांनी डीआरडीए कार्यालयाने या लाभार्थ्यांना अपात्र ठरविल्याचे सांगितले. ग्रामसभा अध्यक्षांनी लाभार्थी अपात्र का ठरले हे समजावून सांगण्याकरिता पर्यवेक्षकाला ग्रामसभेला बोलाविण्याचे सुचविले, पण ते यवतमाळला गेले असल्याचे सांगून सचिवांनी वेळ मारून नेली. परंतु पात्र असतांनाही लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न मिळाल्याने त्यांच्यात कमालीचे नैराश्य दिसून येत होते. ग्रामसभेत सर्व १८० पात्र लाभार्थ्यांचा ठराव घेऊनही १२१ लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा असंतोष दिसून येत होता. त्यांनी घरकुलाच्या मुद्यावरून ग्रामसभेत चांगलाच गदारोळ केला, व सचिवांवर प्रश्नांचा भडीमार केला.
पात्र असूनही का मिळाले नाही घरकुल, हा प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला गदारोळ पात्र असूनही का मिळाले नाही घरकुल, हा प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला गदारोळ Reviewed by सह्याद्री चौफेर on January 11, 2022 Rating: 5
Powered by Blogger.