सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (९ ऑक्टो.) : जिप्सम हे एक भूसुधारक खत असून शेतकऱ्यांना याचे फायदे न कळाल्याने त्यांनी या खताचा कधी वापरच केला नाही. जमिनीची सुपीकता वाढविण्याकरिता हे खत अतिशय फायदेमंद ठरते. दहा वर्षा आधी हे खत कृषी विभातून मोफत मिळायचे. पण आता हे खत कृषी विभागातच काय, कृषी केंद्रांमध्ये सुद्धा मिळत नाही. शेतकऱ्यांना या खताचे महत्वच कळाले नाही. त्यामुळे त्यांनी या खताचा कधी वापराचं केला नाही. खाणीत आढळणाऱ्या रॉक फॉस्फेट पासून सुपर फॉस्फेट हे रासायनिक खत तयार केले जाते. या प्रक्रियेत कॅल्शियम सल्फेट हा उपपदार्थ तयार होतो. जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट. जिप्सम मध्ये कॅल्शियमचे प्रमाण १५ ते २५ टक्के तर गंधकाचे प्रमाण १२ ते १८ टक्के असते. जमिनीत जिप्सम टाकल्यानंतर रासायनिक अभिक्रिया होऊन चिकन मातीच्या कणावर बसलेला सोडियम क्षार सूटा होतो, व कॅल्शियम मातीच्या कणांवर बसतो. आणि सोडियम सल्फेट क्षार निचरा व्यवस्थेतून पाण्याद्वारे बाहेर पडून चोपण जमीन सुधारण्यास मदत होते. २०० ते ३०० किलो जिप्सम एकरी जमिनीत टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढते. जिप्समच्या वापरामुळे चोपण जमिनीचे सुधारित जमिनीत रूपांतर करणे शक्य होते. आता जिप्सम हे खत बाजारात मिळत नसून क्षार पड जमिनीकरिता हे खत आवश्यक आहे. कृषी विभागाने हे खत उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांना ते अतिशय फायद्याचे ठरू शकते. या खतामुळे न पाणी सोडणारी जमिनही सुपिक होते. या खताचे आणखी देखील बरेच फायदे आहेत. या खताची किंमतही अतिशय माफक आहे. कमी खर्चामध्ये कास्तकारांना जास्त फायदा मिळवून देणारं हे खत आहे.
जिप्सम या खताच्या जमिनीतील वापरामुळे होणारे फायदे म्हणजे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची सुपिकता वाढते, जमिनीची रचना बदलण्यास मदत होते, क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण सुटे होऊन ते बाहेर फेकले जाते. त्यामुळे जमिन सुधारते व पाण्याबाहेर येणारे क्षार कमी होतात, बियाण्यांची उगवण चांगली होते, जमिनीची धूप कमी होते, पाण्याचा निचरा कमी होऊन जमिन पाणथळ होत नाही, जमिनीतल्या कॅल्शियम, मॅग्नेशियमचे प्रमाण सुधारते, व सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात, फळांची गुणवत्ता सुधारते, भुईमूंग, कलिंगड, टोमॅटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे, पिकांना गंधक मिळतो, जो पिकांना आवश्यक असतो, पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्य जास्त शोषली जातात, जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांना फायदा मिळतो, कंद पिकाला माती चिकटत नाही, पिकं वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात. या फायद्यांमुळे जिप्सम हे खत शेत जमिनी करिता उपयोगाचे आहे, शेतकऱ्यांनी या खताचा वापर केल्यास शेतीचं उत्पादन वाढू शकते. जिप्सम या खताचा वापर केल्यास कमी खर्चात जास्त फायदा मिळतो. जिप्सम या खताच्या वापरामुळे शेतीतून उत्तम पिक घेतल्याचा दांडगा अनुभव महागाव तालुक्यातील ऊटी या गावातील प्रगतिशील शेतकरी प्रकाश वानखेडे यांनी आमच्या प्रतिनिधी (सह्याद्री न्यूज नेटवर्क) जवळ कथन केला आहे.
शेतकऱ्यांना जीप्सम या खताचं कधी महत्वचं कळालं नाही - प्रगतशील शेतकरी प्रकाश वानखेडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 09, 2021
Rating:
