"करा परिश्रम आजच
घडवा उज्वल भविष्य
मिळेल सुखी जीवन
बनेल समाधानी आयुष्य"
मागच्या पिढीच्या बालपणी आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. मोबाईल, दूरदर्शन, लॅपटॉप, संगणक अशा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची, साधनांची रेलचेल नव्हती. मनोरंजनासाठी खूप कमी पर्याय उपलब्ध होते. सर्वांची परिस्थिती जवळपास सारखीच होती. त्यामुळे गरीब-श्रीमंत हा भेदभाव नव्हता. गरजेच्या वस्तूही रेटारेटीनेच प्राप्त होत. तिथे चैनी करण्याच्या वस्तू किंवा साधने कुठली असणार ! घरात बाबा, काका आणि शाळेत गुरुजी हे दैत्याप्रमाणे कडक असत. त्यांचा पूर्ण कुटुंबावरच वचक असे. त्यामुळे त्यांच्या पुढ्यात तोंड वर करून बोलण्याची कुणाची बिशाद नसे! तिथे पैशाचे लाड नसत. वही-पेन सारख्या वस्तू वर्षभराच्या एकदाच घरात आणून ठेवलेल्या असत. त्यामुळे पैशाची चंगळ नसे.
बाहेरचे काही खावेसे वाटले तर आई-बाबा दुकानातून, बाजारातून आणतील ते गोड मानून खावे लागे. घरातही निरनिराळे फराळ,पकवान्नाचे पदार्थ बनवले जायचे. बाहेरदेखील खाऊचे असे स्नॅक्स सेंटर नसत. त्यामुळे मॉल-हॉटेल माहितच नसायचे. त्यामुळे मुलांच्या मनात खूप शिकून मोठे बनण्याची जिद्द असायची. घरातूनही त्या गोष्टीचे नेहमी पालुपद ऐकवले जायचे. पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला शिक्षणाची संधी मिळते आहे, त्याचा तुम्हीं लाभ घ्या नाहीतर शाळा सोडून घरची शेती करा असा वास्तव सल्ला ऐकून घ्यावा लागे. त्यामुळे जिद्दीने मुले दिवस-रात्र एक करून अभ्यास करत. चांगले गुण मिळवून पुढच्या वर्गात जात.
"अभ्यासानेच साधावे
आपणच आपले हित
नका पळत्याच्या पाठी
जगावे लागेल मग भीत"
गावातली शाळा संपली की तालुक्याच्या शाळेला नि कॉलेजला प्रवेश घेऊन दिला जाई. आमच्या पिढीला मनोरंजनाची काहीच संसाधने नसल्यामुळे अभ्यास एके अभ्यास आणि उरलेल्या वेळेत मुलाने बाबांना शेतीच्या कामात आणि मुलींनी आईला स्वयंपाकाच्या कामात मदत करायची असा दंडक असे. त्यामुळे मुलांनी वावगे वागलेले खपवून घेतले जात नसे. सर्वांच्या घरात सारखीच परिस्थिती. मनाची जिद्द आणि परिश्रम यांच्या जीवावर ती मुले खूप शिकून मोठी झाली. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. त्यानंतर मात्र आई-वडील दोघेही कमावते असल्याने आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या अपत्याला द्यायचे अशी आई वडीलांची मानसिकता झाली. त्यामुळे हल्ली मुलांना ते सर्व सुखसोयी उपलब्ध करून देत आहेत. आपण आपल्या मुलाला जास्त वेळ देऊ शकत नाही म्हणून बाहेरचे जंक पदार्थ खाण्यासाठी, शॉपिंग, सिनेमासाठी मुबलक पैसे पुरवितात. करमणुकीसाठी मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक घेऊन देतात .परंतु अपत्य आपला वेळ अभ्यासात न घालवता दूरदर्शनमध्ये व्यतित करते. आपणाकडे असलेल्या वेळेचा उपयोग ते मोबाईल, लॅपटॉपवरील गेम खेळून वाया घालवते. ना त्या मुलाला वेळेचे महत्त्व, नाही आई-वडिलांचे त्याच्यावर काटेकोरपणे लक्ष. यामुळे ही पिढी मोबाईलच्या जाळ्यात गुरफटत चालली आहे. त्यांना बसल्या जागी हवी ती वस्तू मिळत आहे, त्यामुळे पैशाचे मोलही समजत नाही आणि ते पैसे कमवण्यासाठी आपल्या आई-वडिलांना किती परिश्रम करावे लागतात हे देखील कळत नाही. आई-वडीलपण मुलांना समजावून सांगत नाहीत. एकदा अशा चंगळवादी जीवनाची सवय झालेले मूल आपली सारासार बुद्धी देखील हरवून बसते. आपल्या आई-वडिलांनी खस्ता खाऊन शिक्षण घेतले तेव्हा ते आज एवढे पैसे मिळवत आहेत. आज उच्च पदावर काम करत आहेत. आपणही अभ्यास करून, मेहनत करून आपले नाव उंचावले म्हणजे आपले भवितव्य सुधारेल हे त्यांना कळत नाही. आज आपण आराम करत आहोत तो कायमस्वरूपी नाही तर तात्पुरता आहे. तो आई वडिलांच्या जीवावरचा आहे. आज आपण आराम केला तर पुढे हराम होणार आहे हे त्यांना समजले तर ते मूल अभ्यास करून यश मिळवेल आणि आपले भविष्य सुधारत पुढचे जीवन आनंदाने, आरामात व्यतित करेल.भावी आयुष्याच्या सुखासाठी आज कष्ट करणे अपरिहार्य आहे. आपले जीवन सुखी करायचे असेल तर आजच परिश्रम करायला हवे हे विद्यार्थी जीवनातच लक्षात घ्यायला हवे. उशीर झाला तर सर्व जीवन अंधकारमय होऊन जाईल.
आई-वडील आपल्या जन्माला पुरणार नाहीत. त्यांच्या वृद्धपणी आपणच त्यांची काठी व्हायचे आहे आणि त्यांना आधार द्यायचा आहे हे समजायला हवे तरच स्वतःची प्रगती साधता येईल.
"असावी आई-बाबांच्या
कष्टाची मुलांना जाणीव
बनवून आधाराची काठी
भासू देऊ नकाच उणीव"
~ सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835
आराम हराम आहे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 05, 2021
Rating:
